निवडणूक आयोग अँक्शन मोडवर! पहिला झटका शिंदे गटाला, 'त्या' नेत्याच्या अडचणी वाढल्या, आता...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपावर, कधीही शिक्कामोर्तब होऊन पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याला निवडणूक आयोगाने पहिला झटका दिला. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी या नेत्यावर आक्षेप घेण्यात आला होता. निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रारही करण्यात आली होती. आता या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने या नेत्याला थेट खुलासा मागविला आहे. येत्या चोवीस तासात समाधानकारक खुलासा न आल्यास या नेत्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
प्रकरण नेमकं आहे तरी काय?
कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे आता अडचणीत आले आहेत. शुक्रवारी कळमनुरी येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलं. मतदारांना आणण्यासाठी त्यांना फोन पे ने पैसे पाठवा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी आक्षेप घेत, त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांनी आचारसंहिता भंग केली आहे, असे या तक्रारीत म्हटले होते.

निवडणूक आयोगाने घेतली दखल
आमदार संतोष बांगर यांनी मतदारांना पैशाच प्रलोभन दाखवल्याची तक्रार अजित मगर यांनी केल्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. निवडणुक आयोगाच्या वतीने आमदार संतोष बांगर यांना आपल्या वक्तव्याचा खुलासा सादर करण्याची नोटीस बजावण्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुढील 24 तासांमध्ये आमदार बांगर यांनी खुलासा सादर करावा, असं त्या नोटीसमध्ये म्हटलं आहे. सदरील व्हिडिओ निवडणुक विभागाच्या वतीने तपासल्या जात असून, याप्रकरणी लवकरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
निवडणूक रंगण्याची शक्यता
आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणावरून आत्ताच्या अहिल्यानगर व पूर्वीचा अहमनगर जिल्ह्यात विखे-गडाख खटला हा चांगलाच गाजला होता. १९९१ साली नगर दक्षिणेची लोकसभेची लोकसभेची निवडणूक थेट कोर्टात गेली होती. त्यानंतर संपूर्ण देशाला आचारसंहितेचे महत्त्व कळाले होते. आताही आचारसंहितेवर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष असणार आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप पाहता, भविष्यात अजून कोणती प्रकरणे पहावी लागतात, हे मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, येत्या 24 तासांत खुलासा सादर करावा लागणार असल्याने आ. संतोष बांगर चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications