विधानसभेसाठी एकनाथ शिंदे यांचा नेत्यांना कानमंत्र
लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून आगामी निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागा, असा कानमंत्र मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपले सहकारी नेते, पदाधिकारी आणि मंत्र्यांना दिला.

येत्या १९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा देखील आढावा या शिंदे यांनी घेऊन बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीत शिवसेनेचे सर्व मंत्री, नेते, आमदार, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आणि महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गाफील राहू नका, ताकदीनिशी मैदानात उतरा
लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल एकनाथ शिंदे यांनी पक्षातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. मात्र या निवडणुकीत झालेल्या चूका सुधारून आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागण्याच्या सूचना याप्रसंगी दिल्या. १९ जून या वर्धापन दिनापासून पक्षाची सदस्य नोंदणी सुरू करणे, आपापल्या विभागात मतदारांची नोंदणी करून मतदार याद्या दुरुस्त करणे, तसेच शिवदूतांच्या नेमणुका करणे याला प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत गाफील न राहता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याच्या सूचना यावेळी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिल्या.
शिवसेनेचा स्ट्राईक रेट उबाठापेक्षा अधिक
या लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट हा उबाठा गटापेक्षा उत्तम होता. त्यांनी २२ जागा लढवून ९ जागा जिंकल्या तर आपण १५ जागा लढवून ७ जागा जिंकल्या आहेत. मुंबईत त्यांच्यापेक्षा २ लाख जास्त मते आपल्याला मिळालेली आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छत्रपती संभाजीनगर आपण राखले असून कोकणातही जनतेने महायुतीलाच साथ दिलेली आहे. त्यामुळे जनता आपल्याला साथ देत असताना आता निर्माण झालेले चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत पालटून टाकण्यासाठी आपल्याला अधिक जोमाने काम करावे लागेल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
खोट्या नेरेटिव्हची पुनरावृत्ती विधानसभेत नको
लोकसभा निवडणुकीत 'संविधान बदलणार' असे खोटे नेरेटिव्ह तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विरोधकांना त्यात काही प्रमाणात यश देखील आले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, असा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीसहित हिंदूंचे सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे करावेत, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना केले.












Click it and Unblock the Notifications