युतीतील तणावामुळे 'नाराज' एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना; BJPच्या बिग बॉस समोर 'गाऱ्हाणे' मांडणार!
BJP Shiv Sena tensions : महायुतीतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मित्रपक्षाचे पदाधिकारी फोडल्याच्या भाजपवरील आरोपानंतर आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुधवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची भेट घेऊन ते राज्यातील ताज्या राजकीय घटनाक्रमावर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाची वाढलेली नाराजी आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनातील 'खरडपट्टी'च्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार आणि नाराजीची किनार
मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी भाजपवर 'फोडाफोडीचे' राजकारण करत असल्याचा आरोप करत बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर या नाराज मंत्र्यांनी दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांची खरडपट्टी
सूत्रांनुसार, याच भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या मंत्र्यांची थेट खरडपट्टी काढली. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका व्यासपीठावर एकत्र येणे टाळले. यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपवर नाराज असल्याचा आणि युतीमध्ये तणाव वाढल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. या तीव्र नाराजीच्या पार्श्वभूमीवरच शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
भाजपच्या 'बिग बॉस' नेत्यांची भेट घेणार!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. ते विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे महायुतीतील घडामोडी आणि शिंदे गटाच्या अडचणींबाबत गाऱ्हाणे मांडण्याची शक्यता आहे. दिल्लीतील भेटीगाठीनंतर ते थेट बिहारची राजधानी पाटणा येथे नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्यासाठी रवाना होतील.
वाढलेल्या दिल्ली दौऱ्यांचे राजकीय अर्थ
गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. जेव्हा जेव्हा महायुतीत अंतर्गत वाद किंवा तणाव निर्माण होतो, तेव्हा शिंदे हे दिल्लीत जाऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक दिल्ली दौऱ्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जातात.
ऑक्टोबर दौरा
गत ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी जागावाटप आणि पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील वादाची किनार होती.
ऑगस्ट दौरा
तत्पूर्वी, ऑगस्ट महिन्यातही त्यांनी दोनवेळा दिल्लीचा दौरा केला होता, त्यावेळीही त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली होती.
शिंदेंचे वारंवार वाढलेले हे दिल्ली दौरे हे राज्यात सत्ताधारी महायुतीत 'सर्वकाही ठीकठाक नाही' याचे द्योतक मानले जात आहेत.
शिवसेना भाजपवर नाराज का?
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपवर नाराज होण्याचे मुख्य कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेले 'फोडाफोडीचे' राजकारण आहे.
पदाधिकारी फोडणे
भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी सातत्याने आपल्याकडे ओढले जात आहेत. शिवसेनेला अडचणीचे ठरतील असे अनेक पक्षप्रवेश भाजपकडून राज्यात करून घेतले जात आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील धक्का
मंगळवारी (काल) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
खासदार श्रीकांत शिंदेंना धक्का
भाजपमध्ये प्रवेश केलेले हे पदाधिकारी खासदार श्रीकांत शिंदे (एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र) यांच्या खास मर्जीतील होते. त्यामुळे भाजपने थेट आपल्याच मित्रपक्षाच्या खासदाराच्या जवळच्या लोकांना गळाला लावल्यामुळे शिंदे गट प्रचंड नाराज झाला आहे.
या तीव्र नाराजीमुळेच काल मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला आणि आता हे प्रकरण पुढील काही दिवस तापण्याची शक्यता आहे. या तणावावर दिल्लीतील भाजपचे उच्चपदस्थ नेते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications