बहिण लाडकी अन् विरोधकांच्या छातीत धडकी! CM शिंदेंचा टोला, बहिणींनो 'या' तारखेला येणार खात्यात पैसे
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana :"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांच्या खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत पैसे येतील. तोपर्यंत बहिणींना अर्ज भरण्याची मुभा आहे. काळजी करु नका माझ्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत असा विश्वास देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहिण लाडकी अन् विरोधकांच्या छातीत धडकी असे वक्तव्य करत त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं म्हटलं आहे.
परांडा, धाराशिव इथं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' प्रचार-प्रसार मेळाव्यात आज ते बोलत होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे गैरहजर होते.

का होते अजित पवार आणि फडणवीस गैरहजर
एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहिण योजना यशस्वी झाली आज मला याचा आनंद आहे, इथं जो सोहळा सुरु आहे तो दृष्ट लागण्यासारखा आहे. लाडक्या बहिणींच्या जीवनात चांगला दिवस यायला हवे असे आम्हाला वाटत आहे. कुणी म्हणेल की, आज दोन उपमुख्यमंत्री या कार्यक्रमात नाहीत दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबईत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आले आहेत ते दोघे तिकडे गेले आहेत.
माझं मनं भरुन आलयं..
एकनाथ शिंदे म्हणाले, मी राज्याचा मुख्यमंत्री असलो तरीही गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तमाम बहिणींनी मला लाडका भाऊ केलं आहे. मी मुख्यमंत्री झालो त्यापेक्षा जास्त दुप्पट आनंद मला तुमच्या प्रेमामुळे दिली. लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद वाटतोय याचं आम्हाला समाधान आहे. माझं मन भरुन आलं की आपण जे केलं ते सार्थकी लागलं.
30 सप्टेंबरपर्यंत पैसे येईल
एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली, ते म्हणाले काही लोक या योजनेवरुन टीका करत होते पण आमच्या सरकारने रक्षाबंधनच्याआधी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकले. ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांच्या खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत पैसे येईल. तोपर्यंत बहिणींना अर्ज भरण्याची मुभा आहे. काळजी करु नका माझ्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत.
बहिणींच्या चेहऱ्यावरील भावना हेच माझे टाॅनिक
एकनाथ शिंदे म्हणाले, बहिणींच्या चेहऱ्यावरील भावना हेच माझे टाॅनिक आहे. ही गर्दी पाहून मला ऊर्जा आणि प्रेरणा येते. या लाडक्या भावाच्या पाठीशी महिलांनी राहावे लागेल. कारण मी तुमचा भाऊ आहे आणि मला तुमची साथ हवी आहे. तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत. कुणी मायका लाल आला तरीही ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही. अनेक लोकांनी या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला.
विरोधकांना पोटदुखी
एकनाथ शिंदे म्हणाले, कुणी कोर्टात गेलं त्यांना कोर्टानं चपराक लगावली. ज्यांनी या योजनेत खोडा घातला त्या दृष्ट सावत्र भावांना तुम्ही जोडा योग्यवेळी दाखवा. लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये दिले याची पोटदुखी विरोधकांना का होत आहे असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दीड हजारांची किंमत विरोधकांना नाही
एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या बहिणींबद्दल विरोधकांनी बोलताना त्यांना मनाची नाही तर जनाची तरी वाटायला हवे होते. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, चांदीचा खुळखुळा घेऊन आलेले आणि पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजारांची किंमत कळणार नाही ती किंमत माझ्या लाडक्या बहिणींना आणि भावाला कळाली.
बहिण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत धडकी
एकनाथ शिंदे म्हणाले, मी शेतकऱ्यांचा मुलगा असून सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. माझी आईही काटकसर करायची, म्हणूनच मला आता लाडक्या बहिणींच्या जीवनात बदल घडवण्यासाठी निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींचा आम्हाला आशीर्वाद असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बहिण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत धडकी अशी त्यांची स्थिती झाली आहे.












Click it and Unblock the Notifications