लाडकी बहिण योजनेचे पुढच्या 2 हप्त्यांचे पैसे कधी जमा होतील? मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकली डेडलाईन
आमचे सरकार देणारे आहे, हे घेणारे सरकार नाही. काही लोक त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतील. मी शब्द देतो की, दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये ऑगस्टमध्ये आले पण आता आणखी पुढच्या दोन हप्त्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात जमा होतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलं.
महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत सुरु असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या यवतमाळ इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर आपला निशाणा साधला.

1 कोटी 7 लाख बहिणांच्या खात्यात पैसे आले
एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र बंद करणाऱ्यांची तोंड ही गर्दी पाहून बंद होतील. अत्यंत कमी वेळेत आम्ही एक कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त महिलांची नोंदणी लाडकी बहिण योजनेसाठी झाली. यापैकी एक कोटी सात लाख बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले आहेत.
विरोधक नंतर जमीनीवर लोळू लागतील..
एकनाथ शिंदे म्हणाले, ही योजना फक्त मतं मागण्यासाठी नाही. माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठा आहे. मुख्यमंत्री माझी बहिण योजना यशस्वी होत आहे. यामुळे विरोधकांच्या पोटात दुखु लागले आहे. दुसरे हप्ते जेव्हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जातील तेव्हा हे विरोधक जमीनीवर लोळू लागतील. ही योजना रद्द करण्यासाठी जे ते प्रयत्न करत आहेत ते प्रयत्न सरकार आणि जनता म्हणून आपण हाणून पाडूया. ही योजना कायम चालणारी आहे, ती बंद होणारी नाही.
मुख्यमंत्र्यांनी बहिणींना दिला शब्द
एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकांचं म्हणणं असं आहे की, बँकेत पैसे जमा होणार नाही पण पैसे जमा जसे झाले तसे यांचे चेहरे पांढरे फटक झाले. काळे ठिक्कर झाले. बुरी नजर वाले तेरा मुंह काला अशी त्यांची अवस्था झाली आहे. हे देणारे सरकार आहे, घेणारे सरकार नाही. काही लोक त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतील. मी शब्द देतो की, आणखी पुढचे दोन हप्ते सप्टेंबर महिन्यात जमा होतील.
ही देना बँक आहे..लेना नही
एकनाथ शिंदे म्हणाले की, ही देना बँक आहे, लेना बँक नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी बदनामी करणाऱ्या विरोधीपक्षाला माझं आवाहन आहे की, तुम्ही आज या ठिकाणी पाहत आहात की, ही योजना यशस्वी झाली आहे. या महिला बहिणी सरकारच्या आणि योजनेच्या पाठीशी उभे राहणार. लोकसभेला जे फेक नरेटीव्ह विरोधकांनी मांडून मतं घेतली होती त्यांना या योजनेने चपराक दिली आहे. ही योजना एवढी लोकप्रिय होईल हे त्यांना वाटलं नव्हतं.
महिन्यांना तीन सिलिंडर मोफत मिळणार
एकनाथ शिंदे म्हणाले, ज्या बहिणींच्या तक्रारी आहेत, त्यांच्या तक्रारी सोडवल्या जातील. आम्ही लाडक्या भावांना सहा, आठ आणि दहा हजारांचे महिन्याला मानधनही मिळत आहे. त्यांना रोजगार मिळत आहे. आता तीन सिलिंडर या बहिणींना मोफत घेण्याचा आपला निर्णय आहे.












Click it and Unblock the Notifications