लाडक्या बहिणींचा महायुतीला मोठा पाठिंबा! आता 2100 रुपये कधीपासून मिळणार? एकनाथ शिंदेंचे मोठे विधान
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Rs 2100 Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महिलांसाठीची महत्वाकांक्षी योजना आहे. महायुती सरकारची ही योजना आता पुन्हा नवीन सरकार आल्यानंतरही सुरुच राहणार आहे. कारण राज्यात महायुतीचेच सरकार आले आहे. अशा स्थितीत महिलांना 1500 वरुन 2100 देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. आपल्या जाहीरनाम्यातही त्यांनी ही रक्कम वाढवू असे म्हटले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.
जुलै 2024 मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सादर केली आणि ही योजना तातडीने लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार निवडणुकीपर्यंत या योजनेचे पाच हप्ते साडेसात हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता लाभार्थ्यांना सहावा हप्ता कधी मिळेल याची प्रतिक्षा आहे.

एकनाथ शिंदे यांनी टप्प्याटप्प्याने लाडकी बहीण योजनेत रक्कम वाढवली जाईल असे म्हटले होते. यानंतर निवडणुकीत जाहीरनाम्यातही त्यांनी आश्वासन दिले होते. आता महायुती पुन्हा सत्तेत आल्याने महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातील पण हे कधी मिळणार याचीच चर्चा आता होत आहे.
कधी मिळणार पैसे
विधानसभा निवडणुकीत महायुतीला 235 जागा मिळाल्या आहेत.लवकरच महायुती सत्तास्थापन करणार आहे. आज 25 नोव्हेंबरला सरकारचा शपथविधी होऊ शकतो. अशा स्थितीत हा शपथविधी झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता महिलांना लवकरच मिळू शकतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिवसेनेच्या (शिंदे) गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे म्हणाले, "ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता 2100 रुपये होतील. आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत.
तुम्ही मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे आणि आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे. मला पत्रकार नेहमी विचारायचे की तुमच्या किती जागा येणार? त्यावेळी मी त्यांना म्हणायचो, आम्हाला बहुमत मिळेल. परंतु, तुम्ही आम्हाला बहुमतापेक्षा जास्त जागा दिल्या आहेत. मी म्हणायचो आम्हाला थम्पिंग मेजॉरिटी मिळेल. परंतु, तुम्ही तर विरोधकांना डम्पिंग मध्ये टाकलं आहे, असेही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications