उद्धव ठाकरे हे कटप्रमुख; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल; म्हणाले- मी वर्क फ्रॉम होम करणारा नेता नाही
Eknath Shinde Dussehra Speech 2025 : उद्धव ठाकरे हे कटप्रमुख आहे, जे स्वत:च्या पक्षाला संपविण्याची भूमिका घेतात, याला जबाबदार कोण आहेत, याचा विचार कधी त्यांनी केला आहे, येणाऱ्या निवडणुकीत त्यांची सावली देखील त्यांच्यासोबत राहणार की नाही, असा प्रश्न पडला आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवला. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, सात पिढ्या आल्या तरी असे होणार नाही. परंतु, याचेच राजकारण आता काही लोक करतील, असे म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला मारला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेनेचा दसरा मेळावा आज गोरेगावातील नेस्को मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत या दोन प्रमुख मुद्द्यांभोवती या मेळाव्याचे केंद्रस्थान होते. शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवत, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठी घोषणा केली.

'व्हॅनिटी व्हॅन' आणि 'फेसबुक लाईव्ह' वरून उद्धव ठाकरेंना टोला
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीवर भर देत अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर निशाणा साधला. संकटाच्या काळात प्रत्यक्षात लोकांमध्ये राहण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. "कपड्याची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅनमधून दौरा करणारा हा एकनाथ शिंदे नाही. वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा तर नाहीच नाही." कोल्हापूर, महाड, चिपळूणसह केरळ, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि नेपाळमधील पर्यटकांनाही आपल्या लोकांनी सुखरूप आणण्याचे काम केले.
बाळासाहेबांचा गुरूमंत्र
एकनाथ शिंदे म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, संकटात कार्यकर्ता घरात नाही, तर लोकांच्या दारात दिसला पाहिजे." आपत्तीमध्ये घरात बसणारा बाळासाहेबांचा शिवसैनिक असूच शकत नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
निवडणुकीचे लक्ष्य
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना 'मुंबई मनपावर महायुतीचा भगवा' फडकवण्याचे लक्ष्य दिले आणि त्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
'दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल हा माझा शब्द' राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या संकटावर शिंदे यांनी अत्यंत भावनिक आणि संवेदनशील भूमिका घेतली. त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत दिलासा दिला.
काळजी करू नका
"पाऊस अगदी वैऱ्यासारखा कोसळला आहे. अशा परिस्थितीत बळीराजाला हात द्यायचा नाही, तर कधी द्यायचा?", "मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याचे कष्ट, दु:ख, वेदना आम्हाला माहिती आहेत."
मदतीचा शब्द
"आपल्या पूरग्रस्तांची, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या पूर्वी त्यांना मदत दिली जाईल, हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे."
अटी-शर्ती बाजूला
मंत्रिमंडळात कुठल्याही अटी-शर्ती बाजूला ठेवून बळीराजाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'जिथे संकट, तिथे मी'
"जिथे संकट, तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही, हे आपले धोरण आहे, असेही शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांची पाठराखण
शिंदे म्हणाले की, 'मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण आहे.' ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आज असते तर, त्यांनी देखील बळीराजाच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयावर आपल्या शिवसैनिकांची पाठ थोपटली असती.
गुलाबराव पाटील यांचा संजय राऊत आणि राज ठाकरेंवर घणाघात
शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत उद्धव ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
राज ठाकरेंना टोला: "ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला, त्यांना आता 'आय लव्ह यू' म्हणायचे!"
संजय राऊत 'पांढऱ्या पायाचा'
"संजय राऊत सगाई लावणारा भटजी आहे. त्याने ज्यांची ज्यांची सगाई लावली, त्यांचे लग्न तुटलेले आहे. हा द्वाड, पांढऱ्या पायाचा माणूस आहे, त्याने सगळ्यांचा सत्यनाश केलेला आहे."
संजय राऊत 'भूत'
"हा जो संजय राऊत नावाचे भूत आहे, सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या अंगात भटकंती येते. समोर माईक दिसले नाहीत, तर त्यांच्या अंगात चुडेल चढती."
मीडियाला आवाहन
त्यांनी टीव्हीवाल्यांना सांगितले की, माईकऐवजी लाकडी बांडगं (बांबू) तयार करा आणि त्यावर चॅनेलची नावे लिहून त्यांच्या घरासमोर ठेवा, ते पाहिल्याशिवाय त्यांच्या आत्मा स्वस्थ बसणार नाही.
ज्योती वाघमारे यांचा टीकेला प्रत्युत्तर
शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी शिंदे यांच्या दातृत्व आणि नेतृत्वाचा स्थायी भाव असल्याचे सांगितले.
मदतीवर टीका
"तुम्ही शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या जमिनी, लोकांची पडलेली घरे, लोकांच्या डोळ्यांतील अश्रू नाही पाहिले, पण लोकांना मदत दिली तरी एकनाथ शिंदेंच्या फोटोवरून टीका करतायत. अरे किती जळाल?"
सॅनिटरी पॅडवर फोटो
त्यांनी टीका करताना 'उबाठाने सॅनिटरी पॅडवर पेंग्विनचे फोटो लावले' असा उल्लेख करत, त्यांनी केलेल्या मदतीवर फोटोवरून टीका करणाऱ्यांवर पलटवार केला.
एकंदरीत, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दसरा मेळावा शेतकऱ्यांसाठी मदत आणि विरोधकांवर जोरदार टीका या मुद्द्यांनी गाजला.












Click it and Unblock the Notifications