लंडनच्या ब्रिटीश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप’ पुरस्काराने सन्मान
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लंडन येथील ब्रिटीश संसदेच्या वरिष्ठ सभागृहात 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये प्रतिष्ठेच्या 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'यूके एशियन बिझनेस कौन्सिल' आणि 'कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस' यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा बहुमान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या आशीर्वादांना समर्पित केला आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना शिंदे यांनी राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आणि 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. या कल्याणकारी योजनांमुळेच जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या कारभाराची दखल घेतली गेल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ब्रिटीश संसदेत त्यांना मराठी भाषेतून संवाद साधण्याची आणि कवी सुरेश भट यांची 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' ही प्रसिद्ध कविता सादर करण्याची संधी मिळाली. याप्रसंगी बोलताना त्यांनी आई आणि पत्नीच्या कष्टांतून मिळालेल्या संस्कारांचे स्मरण केले.
आपल्या भाषणात त्यांनी मुंबई आणि लंडन या दोन्ही जागतिक वित्तीय केंद्रांमधील सहकार्यावर भर दिला. फिनटेक, ग्रीन एनर्जी आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र आणि ब्रिटन एकत्र येऊन मोठे काम करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक पातळीवर प्रगती करत असल्याचे सांगत त्यांनी मोदींचे कौतुक केले. या सोहळ्याला ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, खासदार आणि विविध देशांचे राजदूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click it and Unblock the Notifications
