एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, राजभवनाकडे पत्र पाठवले, आमदारांची मनधरणी आली कामाला
शिवसेना नेते एकनाथ शिंदे अखेर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचे मान्य केले आहे. शिवसेना आमदारांनी केलेल्या मनधरणीला यश आले असून ते सत्तेत सहभागी होणार आहे. थोड्याच वेळा एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावरुन राज्यपालांना पत्र पाठवविले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गृहखात्यावरुन शिंदे बसले होते अडून?
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे नाराज झालेले होते. गृहखात्यावरुन ते आडून बसल्याची चर्चा होती. दरम्यान, अद्याप भाजपकडून गृहखात्यासंदर्भात कोणताही निरोप देण्यात आलेला नाही.

काय म्हणाले उदय सामंत?
एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही, तर आमच्यापैकी कुणीही मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेणार नाही, अशी भावना शिवसेना नेते उदय सामंत यांनी गुरुवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही याविषयी अजूनही साशंकता होती. त्यानंतर वर्षावर झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे हे राजी झाल्याचे सांगितले जात आहे.
उदय सामंत यांनी गुरुवारी दुपारी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नाही तर आम्हीही मंत्रिमंडळात शपथ घेणार नाही. ही भावना आम्ही एकनाथ शिंदे यांना बोलून दाखिवली आहे. ते सायंकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असा विश्वास शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटले आहे.
उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाबाबात एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका दोनदा पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव बाजूला ठेवून कुणी उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नाही. ते आमचे नेते आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील.
आमचे राजकीय करिअर शिंदेंच्या हाती दिले
उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही तर माझ्यासहित सर्वच आमदार कोणतेही जबाबदारी स्वीकारणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितले आहे. यामुळे ते देवेंद्र फडणवीसांना सहकार्य करत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील. आमचे राजकीय करिअर एकनाथ शिंदेंच्या हाती दिले आहे. त्यांना डावलून जर कुणी काही करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. ही आमची कायमस्वरुपीची भूमिका आहे.
माझ्या नावाने फेक न्यूज
उदय सामंत म्हणाले की, एक बातमी माझ्या नावाने पसरवली जात आहे. शिवसेना मर्ज होणार आहे आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री स्वीकारावे असे मी बोललो.. अशी बातमी पसरवली जातेय. मात्र असं काहीही बोललो नाही. मी त्या वृत्तसंस्थेशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की आमचा यात संबंध नाही. हे मोर्फ केलेलं आहे.. त्यामुळे मी पोलिस तक्रार करणार आहे. आम्ही कुठेही मर्ज होणार नाही.












Click it and Unblock the Notifications