एकनाथ खडसे यांच्या 'मुक्ताई' बंगल्यात चोरी! ७ ते ८ तोळे सोने, तब्बल एवढी रोख रक्कम लंपास
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी धाडसी चोरी झाल्याची धक्कादायक घटना आज, मंगळवारी (२८ ऑक्टोबर २०२५) सकाळी उघडकीस आली. शहराच्या शिवराम नगर भागातील त्यांच्या 'मुक्ताई' बंगल्यात चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

चोरीचा तपशील आणि नेमका किती ऐवज लंपास?
दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने एकनाथ खडसे बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी खडसे यांच्या बंगल्याचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला. तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील खोल्यांमधील कपाटे उचकून घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकले.
या चोरीमध्ये नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याबाबतची माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनी दिली.
- सोने: सुमारे ७ ते ८ तोळे (७० ते ८२ ग्रॅम) सोने, ज्यात खडसे यांच्या खोलीतील ५-५ ग्रॅमच्या ४ सोन्याच्या अंगठ्या आणि नातेवाईकांच्या खोलीतील ५ तोळे सोन्याचा समावेश आहे.
- रोख रक्कम: ३५ हजार रुपये रोख रक्कम.
एकंदरीत लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांच्या सून आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला होता. या दोन मोठ्या घटना अल्पावधीत घडल्याने जळगावमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "चोरी झाली तेव्हा वॉचमन जागेवर नव्हता, पण चोरट्यांनी निवांतपणे सर्व कुलूपं तोडली आणि खोल्या तपासल्या आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये पोलिसांचा धाक उरलेला नाही," अशी टीका त्यांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस तातडीने मुक्ताई बंगल्यावर दाखल झाले आहेत. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications