भयानक...! भुगर्भातून विचित्र आवाज आणि भुकंप, नंदूरबार जिल्हा हादरला; 2.2 रिश्टर स्केलची नोंद
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खोकसा आणि कळवण परिसरात काल रात्री दहा ते अकराच्या भुकंपाचे धक्के बसले. ही गावे गुजरातच्या सिमेलगत येत असून, गुजरातच्या गांधीनगर येथील भूकंपमापन केंद्रात कडवण परिसरातील भुकंपाची 2.2 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या परिसरात भूगर्भातून विविध आवाज येत असल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलं. दोन दिवसांपासून भूकंपाचे हलके धक्के जाणवत असचंही नागरिकांचं म्हणणं आहे. काल शुक्रवारी रात्री भुकंपाचे धक्के बसल्यानंतर नागरिकांनी उघड्यावरच रात्र काढली. दरम्यान, या परिसरात भूगर्भशास्त्र विभागाचे अधिकारी दाखल झाले असून, आवाजाचे गूढही शोधले जात आहे.

उघड्यावर काढल्या जाताहेत रात्री
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांत भुकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती आता समोर येत आहे. नवापूर तालुक्यातील खोकसा, कोटखांब, कामोद, नागझरी, सरी, बोरझर, करंजी या गावांत भुगर्भातून आवाज येत असल्याच्याही तक्रारी आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थांना महिला व मुलांसह रात्री जागरण करत घराबाहेरच बसावे लागत आहे. खोकसा गावातील अनुदानीत आश्रमशाळेतील विद्यार्थी बुधवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाहेरच थांबले होते. काल रात्री भुकंपाचा आवाज वाढल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक संस्थाचालक भयभीत झाले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण वस्तीगृह रिकामे करण्यात आले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रकाश वसावे, विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांना दिलासा दिला.
खा. पाडवींनी दिली घटनास्थळी भेट
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नवापूर तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील खोकसा व लगतच्या गावांना काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी, माजी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक, तहसीलदार दत्तात्रय जाधव आदींनी गावात जाऊन पाहणी केली व गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. नाशिक जिल्ह्यातील मेरी येथील तज्ञांची टीम सोमवारी या परिसराची पाहणी करणार आहे. भुगर्भातील आवाज नेमका कशाचा आहे, याचे उत्तर लवकरच मिळेल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन, पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले.












Click it and Unblock the Notifications