प्रवाशांना मोठा दिलासा! दिवाळीत होणारी एसटीची प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द,परिवहन मंत्र्यांची घोषणा
Diwali 2025 msrtc bus fare hike cancelled : दिवाळीच्या तोंडावर गावी जाणाऱ्या एसटी (ST Bus) प्रवाशांसाठी ही एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) जाहीर केलेली प्रस्तावित १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही भाडेवाढ मंगळवारी जाहीर करण्यात आली होती, मात्र सर्वसामान्यांकडून वाढलेला विरोध आणि राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन, दुसऱ्याच दिवशी ती तातडीने मागे घेण्यात आली आहे.

एका दिवसात निर्णय का बदलला?
एसटी महामंडळाने १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या दिवाळीच्या गर्दीच्या काळात १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्याची घोषणा केली होती. या काळात प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयावर सर्वसामान्यांसह अनेक स्तरांतून नाराजी व्यक्त होत होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नाराजीची दखल घेतली आणि भाडेवाढ तत्काळ रद्द करण्याची सूचना केली.
पूर परिस्थितीचा संदर्भ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सध्याची पूर परिस्थिती लक्षात घेऊन, ही भाडेवाढ रद्द करावी, असे सुचविले.
परिवहन मंत्र्यांचे निर्देश
एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढ रद्द करण्याचे आदेश एसटी प्रशासनाला दिले. या निर्णयामुळे पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने खचलेल्या बळीराजासह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोणत्या बसेसना भाडेवाढीचा फटका बसणार होता?
एसटी महामंडळाने प्रस्तावित केलेली १० टक्के दरवाढ वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस वगळता, सर्वच बसेससाठी लागू होणार होती.
यामध्ये गावखेड्यांतून धावणाऱ्या साध्या बसेसपासून ते रातराणीने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा समावेश होता.
दिवाळी सणासाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे आणि आजही एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जातो.
आधीच राज्यातील सामान्य माणूस नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत असताना, सार्वजनिक वाहतुकीच्या भाड्याची दरवाढ त्यांच्यासाठी अतिरिक्त बोजा ठरली असती. हा निर्णय रद्द झाल्यामुळे सर्वसामान्यांचा दिवाळीचा प्रवास आता त्यांच्यासाठी परवडणारा राहील.












Click it and Unblock the Notifications