'ते' 44 काॅल्स कुणाला व का? आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा; दिशाच्या वडिल्यांच्या दाव्याने खळबळ
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सालीयान हिच्या वडीलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलीच्या मृत्यू प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी आपल्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन नंतर तिची हत्या केल्याचा दावा केला आहे. शिवाय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

काय केले आहेत दावे?
मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या याचिकेत सतीश सालियन यांनी म्हटले आहे की, दिशाचा मृत्यू अचानक झालेला नाही. तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. दिशा तिच्या करिअरबद्दल खूप गंभीर होती. त्यामुळे ती आत्महत्या करणे शक्य नाही. माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मालवण पोलिस ठाण्यातील अधिकारी हे दिशाचा मृत्यू अपघात असल्याचे सांगत होते. त्यांनीच माझ्या कुटुंबाला दबावात घेत नजरकैदेत ठेवलं होतं, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरेंवर आरोप
या याचिकेत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, अभिनेता सुरज पांचोली आणि दिनो मोरिया यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या तिघांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याचा दावा सतीश सालियन यांनी केला आहे. सुशांत सिंग रजपूत याची हत्या झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी रिया चक्रवर्तीला ४४ फोन केल्याचा दावाही, सतीश सालियन यांनी केला आहे. मुंबई पोलिस यांच्याच दबावात सत्य लपवत असल्याचेही सालियान यांचे म्हणणे आहे.
सामुहिक बलात्काराचा आरोप
या याचिकेत असेही म्हटले आहे की, ८ जून २०२० च्या रात्री दिशाच्या मालवण येथील घरी एक पार्टी होती. त्यात तिच्या काही मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या. आदित्य ठाकरे, सूरज पंचोली आणि दिनो मोरिया हे देखील दिशाच्या घरी होते. या पार्टीनंतरच तिची हत्या झाली. तिच्यावर अगोदर सामुहिक बलात्कार झाला आणि नंतर तिला मारले. मुंबई पोलिसांनी सर्व साक्षीदार, फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि इतर गोष्टी बनावट पद्धतीने तयार केल्या, असंही दिशाच्या वडिलांचे म्हणणे आहे.
सीसीटीव्ही फुटेज गायब?
ही घटना घडली त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यांनी या घटनेतील आरोपी व अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही दिशाच्या वडिलांनी केला आहे. याचिकेत म्हटले आहे की, घटनेच्या दिवशी इमारत आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आले आहे. तेथे उपस्थित असलेल्या लोकांचे मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) रेकॉर्ड केले गेले नव्हते. त्यामुळे या प्रकरणात त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असं सतीश सालियान यांचे म्हणणे आहे.
नार्को टेस्टची केली मागणी
या याचिकेत आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती तसेच पोलिस अधिकारी, डॉक्टर यांची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय या सर्व लोकांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट देखील करण्यात यावी असं सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. या संपूर्ण चौकशी एनआयए किंवा सीबीआयने करावी, असं दिशाच्या वडिलांचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications