Dhule News : काँग्रेसला धक्का.. चक्क या दिग्गज माजी आमदारानेच दाखवला 'हात'! भाजपमध्ये केला प्रवेश
Dhule News : काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसत असून आता चक्क प्रदेश कार्याध्यक्षांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाला 'रामराम'ठोकला आहे. आज त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीररित्या प्रवेश केला आहे.
कुणाल पाटील हे धुळे ग्रामीणचे माजी आमदार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षही ते होते. आज कुणाल पाटील यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश केल्याने काँग्रेसला धुळे जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच भाजपचा होणार फायदा
कुणाल पाटील यांचा जनसंपर्क आणि वैयक्तिक मोठी व्होट बँक असल्याचे मानले जाते. आता महाराष्ट्रात काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कुणाल पाटील यांच्या प्रवेशाने धुळे जिल्ह्यात भाजपला मोठा लाभ होईल, असे मानले जात आहे.
चर्चा संपली, कुणाल पाटील यांचा आता थेट भाजप प्रवेशच
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते कुणाल पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून माजी आमदार कुणाल पाटील यांनी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे धुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून पर्यायाने काँग्रेस दुबळी होत असल्याचे दिसते.
कुणाल पाटील यांच्यासह पदाधिकारीही भाजपमध्ये
माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.मुंबईत दिमाखदार पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. माजी आमदार कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला नूतन प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, मावळते प्रदेशाध्यक्ष महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पालकमंत्री ना. जयकुमार रावल, मंत्री जयकुमार गोरे, आमदार स्मिता वाघ, आदी उपस्थित होते.
कुणाल पाटील यांना राजकीय वारसा
काँग्रेसचे माजी खासदार आणि स्वातंत्र्य सैनिक चुडामण आनंदा पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या तिसर्या पिढीचे वारसदार म्हणून माजी आमदार कुणाल पाटील यांच्याकडे राजकारणातील काँग्रेसचे प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून पाहिले जात होते. त्यांनी दोन वेळा धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिनिधीत्व केले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या राम भदाणे यांनी पराभव केला होता. या पराभवामुळे त्यांनी आपला राजकीय जम बसवण्यासाठी पक्षप्रवेश केला असे म्हटले जात आहे.












Click it and Unblock the Notifications