काळजाचा थरकाप उडवणारी घटना; विहीरीतील मोटार काढताना विजेचा धक्का लागून बाप-लेकांसह चौघांचा अंत!
Dharashiv electric shock accident : शेतात विहिरीतील मोटार काढण्याचे काम सुरू असताना काळाने घात घातला. क्रेनचा स्पर्श महावितरणच्या हायव्होल्टेज विद्युत वाहिनीला झाल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन बाप-लेकांचा, म्हणजेच एकूण चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

विहिरीतील मोटार ठरली काळ
मिळालेल्या माहितीनुसार, केशेगाव येथील गणपत साखरे यांच्या शेतातील विहिरीतील मोटार नादुरुस्त झाली होती. ही मोटार बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली होती. क्रेनच्या साहाय्याने मोटार खेचून वर काढण्याचे काम सुरू असताना, क्रेनचा वरचा लोखंडी भाग वरून गेलेल्या महावितरणच्या उच्च दाबाच्या (High Voltage) विद्युत तारेला स्पर्श झाला.
काही क्षणातच क्रेनमध्ये प्रचंड दाबाचा वीजप्रवाह उतरला. यावेळी क्रेनजवळ आणि मोटार काढण्याच्या कामात मदत करत असलेल्या चौघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. हा धक्का इतका भीषण होता की, कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही आणि चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
दोन कुटुंबांचे आधारवड एकाच वेळी कोसळले
या दुर्घटनेचे सर्वात विदारक वास्तव म्हणजे मृतांमध्ये दोन कुटुंबांतील बाप-लेकांचा समावेश आहे.
फुलारी कुटुंब
५४ वर्षीय कासिम कोंडिबा फुलारी आणि त्यांचा अवघा १६ वर्षांचा मुलगा रतन कासिम फुलारी या दोघांचाही यात अंत झाला. १६ वर्षांच्या मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
साखरे कुटुंब
३० वर्षीय रामलिंग साखरे आणि त्यांचे वडील ५५ वर्षीय नागनाथ साखरे या पिता-पुत्राचाही या अपघातात मृत्यू झाला. एकाच वेळी गावातील चार कर्त्या पुरुषांचा बळी गेल्याने साखरे आणि फुलारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












Click it and Unblock the Notifications