मंत्रीपद गेले, आरोपाच्या भोवऱ्यातून सुटेनात, आता मन शांतीची गरज; धनंजय मुंडेंनी घेतला हा मोठा निर्णय
Dhananjay Munde Latest News : संतोष देशमुख प्रकरणानंतर सातत्याने होणारे आरोप, त्यानंतर गेलेले मंत्रीपद, मतदारसंघातील कमी झालेला वावर, त्यात करुणा शर्मा यांच्याकडून सातत्याने होणारे वैयक्तिक आरोप यातून काही आमदार धनंजय मुंडे यांची सुटका होईना. अशातच धनंजय मुंडे यांनी मनशांतीसाठी मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात दाखल झाले आहेत.
धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे खाते राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना देण्यात आले. त्यानंतर धनंजय मुंडे थेट विपश्यना करण्यासाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून असल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी त्यांना मनशांती मिळेल, या उद्देशाने ते या ठिकाणी गेल्याचे सांगितले जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आरोग्यासंदर्भातील समस्या देखील समोर आल्या होत्या. डोळ्याचे ऑपरेशन देखील झाल्याचे सांगितले जात होते.

मुंडे आता मंत्रिमंडळात येण्याची आशा मावळली
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. राजीनाम्यानंतरही करुणा मुंडे यांच्या गंभीर व खळबळ जनक आरोपांमुळे धनंजय मुंडे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. दरम्यान, राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिल्यानंतर मंत्रिमंडळात पुन्हा येण्याची मुंडेंची आशा आता संपली आहे.
धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात
मागील आठ दिवसांपासून अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार धनंजय मुंडे नाशिक मधील इगतपुरीच्या विपश्यनाकेंद्रामध्ये दाखल झाले आहेत. इगतपुरीच्या विपश्यनाकेंद्रात दहा दिवसांच्या विपश्यनेसाठी ते दाखल झाल्याचा सांगण्यात येत आहे. या ठिकाणी दहा दिवस विपश्यना कोर्स केला जातो. या काळात मोबाईल वापरला जात नाही. या ठिकाणी सकाळी पाच वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम व आपल्या कुटीमध्ये ध्यानधारणा केली जाते. दहा दिवसांच्या या काळात मुंडे यांना बाहेरील जगापासून संपर्क नसणार, त्यामुळे त्यांना मनशांती मिळेल, अशी चर्चा देखील होऊ लागली आहे.
धनंजय मुंडेंनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणं टाळलं!
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा काही दिवसांपूर्वी दौरा होता. तो दौरा देखील मुंडे यांनी अचानक रद्द केला होता. त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान देखील धनंजय मुंडे हे बीड मध्ये आले नव्हते. ते त्यांच्या मुलीच्या फॅशन शो कार्यक्रमाला गेल्याचे वृत्त समोर आले होते. एकंदरीत धनंजय मुंडे विविध सार्वजनिक कार्यक्रमाला जाण्यापासून ते स्वत:ला टाळत असल्याचे दिसून आले आहे.












Click it and Unblock the Notifications