हायकोर्टाकडून माजी मंत्री धनंजय मुंडेंना झटका, कोर्टाने दिले महत्त्वाचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. करुणा शर्मा यांना देण्यात येणाऱ्या पोटगीपैकी 50 टक्के रक्कम येत्या 4 आठवड्यांत न्यायालयात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. हा आदेश न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाने दिला. यानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना मुंडेंवर टीकेची झोड उठवली.

न्यायालयीन निर्णय: 43.75 लाखांपैकी अर्धी रक्कम भरण्याचे निर्देश
धनंजय मुंडे यांनी वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, ज्यामध्ये त्यांना करुणा शर्मा यांना महिन्याला ₹1.25 लाख पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट केलं की, ऑगस्ट 2022 ते जून 2025 या 35 महिन्यांच्या पोटगीची एकूण रक्कम ₹43,75,000 इतकी होते. यातील 50% म्हणजे ₹21,87,500 रक्कम त्यांनी 4 आठवड्यांत जमा करावी लागेल.
त्याचबरोबर त्यांच्या मुलीसाठीची 100% पोटगीची रक्कम देखील कोर्टात भरावी लागणार आहे. न्यायालयाने स्पष्ट केलं की, या याचिकेवर अंतिम निर्णय 8 आठवड्यांत दिला जाईल.
करुणा मुंडेंची प्रतिक्रिया: "मी शांत बसणार नाही"
करुणा मुंडे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "धनंजय मुंडे मूलतः वाईट व्यक्ती नाहीत, पण त्यांच्याभोवती असलेल्या दलाल गँगमुळे ते चुकीच्या मार्गावर चालले आहेत."
तसेच त्यांनी दावा केला की, "माझ्या आणि मुलीच्या विरोधात धमक्या दिल्या जात आहेत. मोबाईलवर एआयच्या साहाय्याने अश्लील व्हिडिओ पाठवले जात आहेत. त्याबाबत मी वांद्रे न्यायालयात अर्ज सादर केला आहे."
करुणा मुंडे पुढे म्हणाल्या, "कोर्टाने आता माझ्यासाठी 50% पोटगीची रक्कम आणि मुलीसाठी 100% रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत, पण तोपर्यंत मी शांत बसणार नाही. माझा हक्काचा पैसा मिळेपर्यंत मी लढत राहणार."
धनंजय मुंडे यांना उच्च न्यायालयाने दिलेला आदेश राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर मोठा झटका मानला जात आहे. यामुळे पुढील आठवड्यांत या प्रकरणात अधिक ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. न्यायालयीन सुनावणीसह, करुणा मुंडे यांचे आरोप आणि पोटगी प्रकरणाचा पुढील अध्याय अधिकच नाट्यमय होण्याची चिन्हे आहेत.












Click it and Unblock the Notifications