Devendra Fadnavis : राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; देवेंद्र फडणवीस म्हणाले- आम्हाला काही फरक पडत नाही
Devendra Fadnavis : राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. तसे संकेत देखील गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांकडून दिले जात आहेत.
यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ते एका मराठी वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात संवाद साधत होते. त्यावेळी त्यांना ठाकरे व पवार कुटुंबांच्या एकत्रिकरणाच्या शक्यतेवर प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी थेट व स्पष्ट भूमिका मांडली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'एनडीटीव्ही मराठी'च्या एका कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांना ठाकरे बंधू आणि पवार काका-पुतण्या यांच्यात पुन्हा एकत्र येण्याची शक्यतेवर प्रश्न करण्यात आला. त्यावर देवेंद्र फ़डणवीस म्हणाले की, कुटुंब एकत्र येत असतील तर आम्हाला अडचण काय आहे. राजकारणात काही गोष्टी कधी व काय होतील हे आत्ताच सांगणे कठीण असते. गेल्या पाच वर्षातील अनुभव तुम्ही महाराष्ट्रातला पाहिला आहे.
'...तर आम्हाला काहीच अडचण नाही'
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझी सर्वात पहिली प्रमुख भूमिका आहे की, कुठलेही परिवार एक होत असतील, तर आम्हाला त्याची अडचण नाही. त्यांनी जरूर एकत्रित यावं. आम्ही त्यांच्या एकत्रित येण्याचं कायमच स्वागत करू.
राज-उद्धव यांच्यावर काय म्हणाले फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, माध्यमे फार जास्त ऐकतात. फार जास्त विचार करतात आणि फार जास्त संदर्भ लावून ते गोष्ट सांगतात. दोन वाक्यांमधील अर्थ काढणं, हे जेवढं तुम्ही करता. मला असं वाटतं की, फार पुढचा विचार तो असतो.
आतातरी मी स्पष्टपणे सांगतो. काय जे चाललेलं असेल... आतातरी अशा प्रकारच्या परिस्थितीत मला कुठलीही एकी-युती दिसत नाही. अर्थात साद आणि प्रतिसाद ज्यांनी दिला असेल, त्यांना मात्र तुम्ही जरूर विचारा. ते याबद्दल अधिक सांगू शकतील. मला फारसं सांगता येणार नाही. त्यामुळे हा मुद्दा तुम्ही त्यांनाच विचारा.
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही एक मुद्दा लक्षात घ्या, जे तुम्ही करता ते कधीच होत नाही. एवढा तर तुम्ही अनुभव घ्या 2019 पासूनचा, असा खोचक टोला त्यांनी लगावत राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य केले.












Click it and Unblock the Notifications