मोर्शीत देवेंद्र भुयार यांची वाट कठीण! तयारी विधानसभा निवडणुकीची, मित्र पक्ष भाजपमधूनच विरोध
Devendra Bhuyar vs Anil Bonde Morshi Assembly Constituency Election :अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देवेंद्र भुयार करीत आहेत. शेतकरी नेते म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. सन 2019 च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून ते मैदानात होते. नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसशी त्यांनी घरोबा केला. त्यामुळे राजू शेट्टी यांनी भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी केली. पुढे राष्ट्रवादी फुटीवेळी भुयार हे सुरुवातीला शरद पवार यांच्या सोबत होते. नंतर अचानक त्यांनी यू टर्न घेत अजित पवार यांची साथ दिली.
आता अजित पवार समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. महायुतीकडून ते मोर्शी मतदार संघात तयारी करीत आहेत. दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांचा त्यांना विरोध आहे. त्यामुळे यावेळी भुयार यांचा विधानसभा प्रवेश सोपा नाही, हे स्पष्ट आहे.

या मतदारसंघात वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांचा समावेश आहे. हा मतदारसंघ लोकसभेसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघाला जोडला जातो. पूर्ण वरुड तालुका आणि मोर्शी शहरासह तालुक्यातील अंबाडा, हिवरखेड, रितपूर आणि मोर्शी या सर्कलचा या मतदारसंघात समावेश होतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले. भाजपचे रामदास तडस यांना येथे पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या भागात महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे.
महाविकास आघाडीकडून ठाकरे किंवा देशमुख
महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असे तीन प्रमुख पक्ष आहेत. या तीनही पक्षांकडून अनेक जण इच्छुक आहेत. त्यात ठाकरे गटाकडून सुधीर सूर्यवंशी, योगेश गारड, उमेश शहाणे दावेदार आहेत.
दुसरीकडे कॉंग्रेसचे युवा नेते विक्रम ठाकरे यांनी मागील पाच वर्षांपासून जनसंपर्क वाढवला. विविध आंदोलन करीत निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यातच शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन देशमुख यांनी गत महिन्यात महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा घेऊन एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सध्या तरी ठाकरे आणि देशमुख प्रबळ दावेदार आहेत. मात्र, जागा वाटपात हा मतदारसंघ संघ कुणाच्या वाट्याला जाणार हे अजून स्पष्ट नाही. ठाकरे आणि देशमुख एकमेकांचे स्पर्धक आहेत. विक्रम ठाकरे यांचे वडील नरेशचंद्र ठाकरे या ठिकाणी कॉंग्रेसच्या तिकिटावर दोनवेळा विजयी झाले होते.
महायुतीकडून भाजपचा दावा
देवेंद्र भुयार हे सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत. पण, या मतदारसंघावर भाजपनेही दावा केलेला आहे. भुयार हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते तथा माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या विरोधात निवडून आले होते. हा निकाल धक्कादायक होता. आता भुयार महायुतीकडून तयारी करीत आहेत. पण, हा मतदारसंघ भाजपला सुटला तर डॉ. बोंडे उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत.
या मतदारसंघात भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांचा देवेंद्र भुयार यांनी गत निवडणुकीत 9 हजार 791 मतांनी पराभव केला होता. तेच भुयार आता अजित पवार गटाकडून तयारी करीत आहेत. पण, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांना विरोध आहे आणि भाजप सहजासहजी हा मतदारसंघ भुयार यांना सोडेल असेही नाही. त्यामुळे यावेळी भुयार यांची वाट बिकट असणार हे निश्चित आहे.
'या' आहेत समस्या
- या मतदारसंघात अनेक समस्या आहेत. खास करून खोपडा पुनर्वसन क्षेत्रातील विकासकामे रखडली आहेत.
- वीज, पाणी, रस्ते, नाल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर रोष आहे.
- मोठी गावे आणि शहरी भागातच विकास कामे केली जातात, असा छोट्या गावातील नागरिकांचा आरोप आहे.












Click it and Unblock the Notifications