आमदार सुरेश धसांचा निकटवर्तीय खोक्या भोसलेच्या कुटुंबावर 15 जणांचा प्राणघातक हल्ला; 4 महिला जखमी
Beed crime news : बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमारास 10 ते 15 अज्ञात व्यक्तींच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला आहे. तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये घडलेल्या या अमानुष हल्ल्यात कुटुंबातील चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

मध्यरात्री कोयते-दांडक्यांनी अमानुष मारहाण
ही धक्कादायक घटना मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अंदाजे 10 ते 15 जणांच्या सशस्त्र टोळक्याने अचानक खोक्या भोसले यांच्या कुटुंबाला लक्ष्य केले. हल्लेखोरांच्या हातात दांडगे, कोयते आणि कुऱ्हाडीसारखी शस्त्रे होती. या टोळक्याने कोणतीही दयामाया न दाखवता कुटुंबातील महिलांवर अमानुषपणे हल्ला चढवला.
महिलांनी जीव वाचवण्यासाठी आणि मदतीसाठी आरडाओरडा करत किंकाळ्या फोडल्या, परंतु हल्लेखोरांनी त्यांचे ऐकले नाही. त्यांनी थेट डोक्यावर, पाठीवर आणि पायांवर वार केले, ज्यामुळे सर्व महिला रक्तबंबाळ झाल्या. या जीवघेण्या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यामागील कारण काय?
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी 'अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता?' असे म्हणत सतीश भोसले यांच्या कुटुंबाला जबर मारहाण केली. यावरून हल्ल्यामागे जागेच्या किंवा राहण्याच्या ठिकाणावरून जुना वाद असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
जखमी महिलांनी कसाबसा शिरूर पोलीस ठाणे गाठून या अमानुष मारहाणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने नोंद घेत तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. शिरूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत आणि हल्लेखोर आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
कोण आहे सतीश उर्फ खोक्या भोसले?
ज्यांच्या कुटुंबावर हा हल्ला झाला तो सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हे शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचे रहिवासी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय असून, भाजप आमदार सुरेश धस यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, खोक्या भोसले यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
काही महिन्यांपूर्वी, समाज माध्यमांवर दहशत पसरवणारे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यामुळे त्यांची चर्चा राज्यभर झाली होती. वनविभागाची कारवाई आणि त्यांच्या घरात सापडलेल्या ऐवजामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. नुकताच, बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या तरुणाला बॅटने मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांना बीड न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.












Click it and Unblock the Notifications