अजित पवार यांनी बारामतीतून रणशिंग फुंकले
मुंबई : विधानसभा निवडणुकीची लगबग आता सुरु झाली आहे. सर्वच पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. सभा, मेळावे, पत्रकार परिषदा, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी यांना वेग आला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने काही उमेदवारांची घोषणा देखील केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अनेक स्थानिक नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन तयारी सुरु केलीय. भाजप आणि शिवसेना देखील आपल्या परीने तयारी सुरु केली आहे. "लाडकी बहिण" योजना घोषित केल्यानंतर अजित पवार यांनी देखील आपल्या पक्षाच्या कवायतीला सुरुवात केली आहे.

अपशयाने खचायचं नाही, यशाने हुरळायच नाही , असा मूलमंत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि विधान परिषदेच्या विजयानंतर प्रथमच त्यांनी बारामतीत विराट मेळावा घेऊन कार्यकर्त्यांणा सन्मानित केले. पावसाच्या धारा कोसळत असतानाही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
काही दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय हा विकासासाठीच घेतला होता आणि यापुढे विकास हाच आपल्या राजकारणाचा मार्ग असेल असे सजित पवार यांनी स्पष्ट केले. लाडकी बहिण योजना घोषित केल्यानंतर काही जणांनी टीका केली, पण त्याकडे मी फारसे लक्ष दिले नाही. सर्व पात्र महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळेल, हा अजित पवारचा शब्द आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
आजचा मेळावा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घटकपक्षांच्या सभा होतील. ज्यात शिवसेना आणि भाजप यांच्या सभांचा समावेश असेल, असेही अजित पवार म्हणाले. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
विरोधी पक्षातल्या नेत्यांना काहीतरी सल्ले द्यायचे. त्यानंतर पाठीमागून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे. सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम बहिष्कार टाकायचा, मुद्दाम तिथे यायचं नाही हे योग्य नाही. निवडणूक असेल तेव्हा तुमचे झेंडे हाती घ्या, मात्र सामजिक प्रश्नी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, हे अजिबात योग्य नाही. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व समाजाचे लोक आहेत. सगळे आमचे आहेत आणि तुमचेही आहेत. एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सुबुद्धी देओ" असं छगन भुजबळ म्हणाले.
या मेळाव्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडी अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार, मंत्री धनंजय मुंडे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते.












Click it and Unblock the Notifications