'ऑलिम्पिक'मध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्नीलच्या आईवडिलांना सॅल्युट...' !
कोल्हापूर : 'ऑलिम्पिक'मध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देवून जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या स्वप्नीलला घडवणाऱ्या त्याच्या आई -वडिलांना सॅल्युट.. ! अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे ऋण व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कर्तबगार खेळाडू असून खेळाला चालना देण्यासाठी अद्ययावत सुविधा देण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये 50 मीटर रायफल थ्री प्रकारात नेमबाज स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवल्याबद्दल त्याच्या आई अनिता व वडील सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरीत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मध्यमवर्गीय असणाऱ्या स्वप्नील च्या आई-वडिलांनी स्वप्निल ऑलिंपिक पर्यंत पोहोचण्यासाठी आजवर खूप कष्ट सोसले आहे. प्रसंगी कर्ज काढून त्याच्यासाठी रायफल, बुलेट व आवश्यक त्या सोयी सुविधा दिल्या आहेत. ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून स्वप्नील ने आई-वडिलांचे कष्ट सार्थकी लावले आहेत. राज्य शासनाच्या वतीने लवकरच स्वप्नीलच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
स्वप्निल कुसळे याने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवत भारतासाठी कांस्यपदक मिळवून दिलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्निल कुसळेने 590 गुणांसह 50 मीटर थ्री पोजिशनच्या पुरुष गटात अंतीम फेरीत धडक मारली होती. अंतीम फेरीत त्याने कांस्यपदक मिळवलं होतं.












Click it and Unblock the Notifications