धक्कादायक बातमी ! मुंबईत 86 वर्षीय महिलेला दोन महिने डिजिटल अटकेत ठेवले; 20.25 कोटी लुबाडले
सायबर व डिजीटल गुन्ह्यांचे प्रकर सध्या वाढले आहेत. डिजीटल अटक हा नवीन प्रकारही वाढला आहे. एखाद्याला कायद्याचा धाक दाखवून त्याच्या घरातच बंदी करुन ठेवायचे असा हा डिजीटल अटकेचा प्रकार असतो. अशी एक घटना मुंबईत उघडकीस आली. तेथील एका ८६ वर्षीय वृद्धेला डिजीटल अटक करुन तिच्या खात्यातून २०.२५ कोटी रुपये लुबाडण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणात दोन वीस वर्षीय तरुणांना अटक केली आहे.

कशी होते फसवणूक
ज्येष्ठ नागरिक हे सायबर गुन्हेगारांचे विशेष लक्ष्य ठरत आहेत. डिजिटल अटक हा सायबर गुन्ह्याचा एक नवीन आणि धोकादायक प्रकार आहे. यामध्ये फसवणूक करणारे फोन कॉल, व्हॉट्सअॅप मेसेज किंवा ईमेलद्वारे लोकांना घाबरवतात. त्यांच्या आधारकार्ड, पॅनकार्डचा गैरवापर झाला आहे किंवा ते एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकले आहेत, असे वृद्धांना सांगितले जाते. हे गुन्हेगार स्वतःला पोलिस, बँक अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी असल्याचे साभसवतात. वृद्धांना डिजिटल पद्धतीने अटक करतात. समाजात बदनामी होईल, म्हणून हे वृद्ध त्यांच्यावर विश्वास ठेवतात व ते जे सांगतील ते करतात.
काय प्रकरण आहे?
मुंबईतील एका ८६ वर्षीय महिलेशी सायबर गुन्हेगारांनी फोनवरून संपर्क साधला. सीबीआय अधिकारी संदीप राव अशी या सायबर गुन्हेगाराने स्वतःची ओळख सांगितली. या वृद्धेच्या आधार कार्ड बेकायदेशीर कामांसाठी वापर झाल्याचे व तिची कागदपत्रे मनी लाँड्रिंगचा वापरल्याचे या ठगाने वृद्धेला सांगितले. महिलेने तपासात सहकार्य केले नाही तर तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी धमकी त्या सायबर गुन्हेगाराने दिली. त्यानंतर घाबरलेल्या या महिलेला डिजिटल अटकेत ठेवण्यात आले. या काळात या महिलेला कोणाशीही संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली. तिचे फोन आणि व्हिडिओ कॉलवरही लक्ष ठेवण्यात आले. नंतर आणखी काही लोक या फसवणुकीत सामील झाले आणि वेगवेगळ्या नावांनी, महिलेला तिच्या बँक खात्यांमधून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
कशी फुटली प्रकरणाला वाचा?
फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला विविध बँक खात्यांमध्ये अनेक हप्त्यांमध्ये एकूण २०.२५ कोटी रुपये ट्रान्सफर करायला लावले. फसवणूक करणाऱ्यांनी खात्री केली की ती महिला नेहमीच त्यांच्या संपर्कात राहील आणि तिच्या नातेवाईकांना किंवा इतर कोणालाही याबद्दल बोलू नये. या काळात महिलेला खात्री देण्यात आली की हा एका गोपनीय तपासाचा भाग आहे आणि तिच्या सुरक्षिततेसाठी असे करणे आवश्यक आहे. पीडितेच्या घरी काम करणाऱ्या महिलेला या वृद्धेच्या वागण्यात बदल दिसला. कामवाल्या महिलेने हे सगळे वृद्धेच्या मुलीला सांगितले. यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. नंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. सध्या पोलिसांनी या प्रकरणात दोन २० वर्षीय तरुणांना अटक केली आहे.












Click it and Unblock the Notifications