अबू सालेमची शिक्षा कमी होणार का..? विशेष टाडा न्यायालयाने दिला 'हा' निकाल
कुख्यात अंडरवर्ड डाँन अबू सालेम उर्फ अबू सालेम अब्दुल कय्युम अन्सारी हा सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपावरुन त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. चांगल्या वागणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करावी, असा दावा त्याच्या वकीलाने केला होता. शिवाय आपला एकूण कारावास २५ वर्षे पूर्ण झाल्याचे त्याचे म्हणणे होते. मात्र हा दावा न्यायालयाने फेटाळला. सालेम याला पूर्ण शिक्षा भोगावी लागेल, असा निर्णय दहशतवादी आणि विघटनकारी क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने दिला.

सालेमला झालीय जन्मठेप
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपावरुन अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो सध्या ५५ वर्षांचा आहे. मुंबई साखळी बाँम्बस्फोटात तो दोषी आढळला होता. तुरुंगात असलेल्या सालेमने न्यायालयात शिक्षा कमी करण्याबाबत याचिका दाखल केली होती. आपल्या शिक्षेत २ वर्षे १० महिन्यांची माफी मिळावी. तसेच आपल्या एकूण शिक्षेस २५ वर्षे पूर्ण झाली असल्याचा दावा त्याने केला होता.
न्यायालयाने फेटाळला दावा
सालेमने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात असे म्हटले आहे की, "अर्जदार ज्या गुन्ह्यात गुंतला होता त्या गुन्ह्याची गंभीरता पाहता, या न्यायालयाने अर्जदाराच्या शिक्षेचा कालावधी मर्यादित करण्याचा किंवा प्रवास करण्यासाठी कोणत्याही विशेष विशेषाधिकारांचा वापर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." सालेम हा लवकर सुटण्याचा हक्कदार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सालेमला गंभीर स्वरुपाच्या शिक्षेत सुट मागण्याचे कोणतेही विशेषाधिकार मिळत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
वीस वर्षांपूर्वी झाले होते प्रत्यार्पण
मुंबई बाँम्बस्फोटात अबू सालेम दोषी आढळला होता. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2005 ला त्याला पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करण्यात आले होते. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांसह दोन टाडा खटल्यांमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पोर्तूगाल व भारतात मिळून त्याचा २५ वर्षांचा कारावास पूर्ण झाल्याचा दावा त्याने केला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तीवाद फेटाळून लावला.
गंभीर स्वरुपाचे गुन्हेही आहेत
अबू सालेम हा 1990 च्या काळातला कुप्रसिद्ध गुंड होता. सुरुवातीला सालेमने दाऊद इब्राहीमसोबत डी कंपनीत काम केले आहे. त्यानंतर त्याने स्वतंत्र गुंडगिरी सुरु केली. अबू सालेमवर अनेक निष्पाप जीवांची हत्या केल्याचा आरोप आहेत. शिवाय चित्रपट अभिनेते, निर्माते, बिल्डर्स यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचेही आरोप आहेत. तो सध्या विविध प्रकरणांमध्ये जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष टाडा कोर्टाने अबू सालेमविरोधात 2006 मध्ये आठ आरोप केले होते.












Click it and Unblock the Notifications