पटोले-राऊत वाद; महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत, आम्ही एकत्र निवडणूक लढवणार- रमेश चेन्निथला
मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे, असं वारंवार सांगितलं जातंय. मात्र काल शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्यावर जागावाटपावरुन मतभेद झाल्याचं समोर आलं. त्यानंतर, पटोले असतील तर आम्ही चर्चेला येणार नाही, अशी टोकाची भूमिका ठाकरे गटाने घेतल्याच्याही बातम्या आल्या.
संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या वाद वाढल्यानंतर आज सकाळीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चोन्नीथला हे मातोश्रीवर आले. मातोश्रीवर येत त्यांनी थेट उद्धव ठाकरेंची भेट घेतली. काँग्रेस व ठाकरे गटातील वादानंतर तातडीने ही भेट झाल्यानंतर चर्चा वाढल्या. उद्धव ठाकरेंची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर चोन्नीथला यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला.

पटोले- ठाकरे गटात नेमका काय होता वाद
मुंबई व विदर्भातील काही जागांवरुन नाना पटोले व संजय राऊत यांच्यात काही वाद झाल्याच्या बातम्या आल्या. लोकसभेला आम्ही काँग्रेसचं ऐकलं व त्यांच्या जागा निवडूनही आणल्या, आता विधानसभेला आमचं थोडं ऐकावं, असा हट्ट संजय राऊत यांनी धरल्याचं समोर आलं. या वादामुळेच महाविकास आघाडीचं जागावाटप रखडल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. या वादानंतर नाना पटोले असतील तर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत आम्ही येणार नाही, अशी टोकाची भूमिका ठाकरे गटाने घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने आज तातडीने महाराष्ट्र प्रभारी रमेश चोन्नीथला यांना मातोश्रीवर पाठवलं. त्यांनी तेथे उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
भेटीनंतर काय म्हणाले चोन्नीथला
मातोश्रीवरुन बाहेर आल्यावर चोन्नीथला यांनी पत्रकारांना भेटीचं कारण सांगितलं. ते म्हणाले, "मातोश्रीवर येऊन मी उद्धव ठाकरेंना भेटलो. ते काही दिवासंपासून रुग्णालयात होते. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी मुंबईत आलो होतो." जागावाटपाबाबतही त्यांनी सूचक विधान केलं. ते म्हणाले, "महाविकास आघाडीची प्रकृती सुद्धा ठीक आहे. महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत. आज दुपारी तीन वाजता नाना पटोले आणि संजय राऊत जागावाटपावर चर्चा करतील." असं सांगत त्यांनी हा वाद मिटल्याचं अनौपचारिक सांगून टाकलं.
#WATCH | Congress' election in-charge for Maharashtra assembly elections, Ramesh Chennithala says, "... MVA has no differences and we are together in this. We will have discussions on seat sharing again at 3 pm today. Nana Patole, Sanjay Raut, and Jayant Patil will work on seat… pic.twitter.com/sj9WCgEWDz
— ANI (@ANI) October 19, 2024
संजय राऊतांनीही दिली वादावर प्रतिक्रीया
चोन्नीथला व उद्धव ठाकरेंची भेट झाल्यानंतर संजय राऊत यांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, "लवकरात लवकर उमेदवारांची यादी जाहीर व्हावी, अशी आमची अपेक्षा. आज रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा पूर्ण होईल.
महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. नाना पटोले आजच्या बैठकीला उपस्थित असतील. चर्चेचा वेग कमी होता. आज दुपारी पुन्हा बैठक होऊन रात्रीपर्यंत सगळं फायनल होईल." तिन्ही पक्षात फार मोठे मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकरणात अशा एखाद दुसऱ्या जागेवरुन चर्चा वाढत असते, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications