लाडकी बहिण, लाडका भाऊ योजनेनंतर आता आजी-आजोबांसाठीच्या योजनेची हवा! फायदा माहितेय का?
मुंबई - राज्यात लाडकी बहिण, लाडका भाऊ योजनेवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत द्वंद्व होत आहे. पण आजी आणि आजोबांसाठीही सरकार योजना चालवत आहे.

काय आहे ही योजना तुम्हाला माहीतेय का? आम्ही तुम्हाला सांगतो या योजनेविषयी ज्यात आजी-आजोबांना किती आर्थिक लाभ मिळतो हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
योजना कशासाठी?
राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आजारपणातील खर्चासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदीसाठी आणि मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार इत्यादीद्वारे त्यांना मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी हा निधी दिला जातो.
काय आहे योजनेचे स्वरुप?
योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारिरीक असमर्थतता, दुर्बलतेनुसार सहाय्यभुत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. उदा. चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाईकल कॉलर इ. तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र येथे सहभागी होता येईल.
इतके मिळते अर्थसाह्य
- 1. राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येईल.
- 2. रु.3 हजार च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल.
लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष जाणून घेऊ
- ज्येष्ठ नागरिक (ज्या ज्येष्ठ नागरिकांना दि.31 डिसेंबर 2023 ) अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तीचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्ती पात्र असतील.
- आधारकार्ड, आधारकार्डसाठी केलेला अर्ज असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्याकडे आधारकार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्विकार्हाय असेल.
- लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशनकार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा.
- लाभर्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्ना रु.2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभर्थ्यांचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
- व्यक्तीने मागील 03 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकाद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामुल्या प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभर्थ्यांचे स्वंयघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र दोषापूर्ण, अकार्यक्षम उपकरणे इ.च्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाईल.
- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचतखात्यात रु.3 हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येतील. सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) प्रमाणपत्र
- सादर करणे आवश्यक आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधारकार्ड, मतदानकार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे फोटो -2
- स्वयं-घोषणापत्र
- शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे
- आरोग्य प्रमाणपत्र
5 ऑगस्टपर्यंत करा अर्ज
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 65 वर्ष व त्यावरील वयोवृद्ध नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी केंद्र व मनपा क्षेत्रातील आपला दवाखाना येथील कोणत्याही केंद्रावर 5 ऑगस्ट 2024 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत परिपूर्ण अर्ज सादर करावा लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications