विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या काही वेळापुर्वी CM शिंदेंची घोषणा, 'या' कर्मचाऱ्यांना 29 हजार बोनस
CM Eknath Shinde announced a bonus : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. या घोषणेच्या काही मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी खूशखबर दिली आहे. त्यांनी 29 हजार रुपयांचा बोनस या कर्मचाऱ्यांना जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम 3 हजार रुपये अधिक आहे.

बालवाडी शिक्षक आशा वर्कर्संनाही बोनस
बालवाडी शिक्षक आणि आशा वर्कर्स यांनाही बोनस मिळणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल.
काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील म्युनिसिपल लेबर युनियनने बीएमसी कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी रामदास आठवले यांच्याकडे मागणीही केली होती. त्याचाच पाठपुरावा रामदास आठवले यांनी करत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. तसेच कर्मचाऱ्यांना एक्स-ग्रॅशिया बोनस देण्याची विनंती युनियनने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांकडे केली होती.
मागणीला दिला सरकारने न्याय
आता या मागणीला राज्य सरकारने न्याय दिला असून त्यांनी कर्मचाऱ्यांना 29 हजार रुपये इतका दिवाळी बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 नोव्हेंबर रोजी बीएमसी कर्मचाऱ्यांना 26,000 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला होता. या तुलनेत यंदा तीन हजारांनी दिवाळी बोनस जास्त आहे.
दरम्यान यानंतर काही मिनिटांतच केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर केल्या यासह झारखंडमध्येही निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एका टप्प्यात तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications