पुणे ड्रग्स प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदेंकडून गंभीर दखल,कडक कारवाई करण्यासाठी पोलिसांना दिले निर्देश
पुणे : पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाते. मागील काही दिवासापासून हे शहर कधी हिट अॅन्ड रनमुळे तर कधी ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत राहिलं आहे.तर पुण्यातील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आल्याची बातमी ताजी असतानाचं पुन्हा एकदा पु्ण्यात हॉटेलच्या वॉशरुममध्ये ड्रग्सचं सेवन केल्याचा व्हिडीओ व्हायरला झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अंमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा,असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
पुणे शहरात अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी.अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
पुणे ड्रग्स प्रकरणावरुन विरोधकांची सरकारवर जोरदार टिका
पुणे ड्रग्स प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलीचं पाहायला मिळालं. कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. दरम्यान शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ट्टिट करुन सरकारवर चांगलीच टिका केली आहे. 'विद्येचे माहेरघर' अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख 'ड्रग्ज व पब्जचे माहेरघर' अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे.
पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे". अशी पोस्ट जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मिडीयावर केली आहे.
पुण्याला ड्रग्जचा विळखा
दोन दिवसापुर्वीच पुण्यातील एफ.सी रोडवरील एल - 3 बार मध्ये पहाटेपर्यंत पार्टी रंगली होती. पार्टीमध्ये काहीजण ड्रग्जचे सेवन करताना दिसून आले. तो व्हिडीओ समाज माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने पसरला. माध्यमांच्या दबावनंतर पोलिसांनी या प्रकरणात 6 जणांना अटक केली आहे.
दरम्यान ललित पाटील प्रकरणापासून पुणे आणि अंमली पदार्थ हे कनेक्शन सातत्याने समोर येत आहे. पोलिसांनी जिल्ह्यात आणि पुणे शहरात अनेक ठिकाणी कारवाई करूनही ड्रग्जचा पुरवठा थांबलेला दिसत नाही. त्यामुळे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे.












Click it and Unblock the Notifications