राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्ला केला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांच्या विचारातून त्यांची क्षुद्र मानसिकता दिसून येते आणि काँग्रेसला धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण करण्याची सवय आहे. त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरील पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिले, विदेशात जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला आहे.असं शिंदेंनी एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे.

मुख्यमंत्री शिंदे पुढे पोस्टमध्ये लिहितात- आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना व महायुतीतील सहकारी पक्ष आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आरक्षण संपवू देणार नाही, याची ग्वाही पुन्हा या निमित्ताने देत आहोत. आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू.
आपला भारत देश ही 'फेअर प्लेस' नाही, असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणं हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे. राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत, हे या निमित्ताने सिद्ध होते. अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धितेजाने लोकांची मने जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या आयटी क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे. त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मान्यही होणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो.असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अमित शहांची राहुल गांधींवर टीका
या आधी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी "आरक्षण" वर अमेरिकेत केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका केली. शहा म्हणाले की, "देशात फूट पाडण्याचा कट रचणाऱ्या शक्तींसोबत उभे राहणे ही काँग्रेस नेत्याची सवय झाली आहे. भाजप कोणालाही आरक्षण रद्द करून देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवू देणार नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले. शाह यांनी पुढे आरोप केला की राहुल गांधींच्या वक्तव्यातून त्यांची फूट पाडणारी धोरणे दिसून येतात.












Click it and Unblock the Notifications