राज्यात विधानसभा निवडणूका कधी ? मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले स्पष्ट संकेत
मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला सर्व पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील प्रमुख नेत्यांनी राज्याचे दौरे सुरु केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार या बाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुका कधी होणार याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदीवली येथील एका कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत. राज्यात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून देण्याचं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
चांदिवली येथील मिठी निदी आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल,कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसनासाठी दिलेल्या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. आमदार दिलीप लांडे यांनी याबाबत सातत्याने पाठपूरावा केला होता. क्रांती नगर आणि संदेश नगरच्या 400 कुटूंबांना हक्काच्या घराच्या चावीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचं उद्दिष्ट असल्याचं शिंदे यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेला मुदत वाढ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली आहे. आगामी काळात 1500 रुपयाची रक्कम वाढवण्यात येईल. तसेच महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तरुणांसाठी युवा कौशल्या प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना सुरु केली आहे. या बरोबरच राज्यातील शेतक-यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेव्दारे पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार सुरु करण्यात आले, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications