मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष; एकनाथ शिंदे यांचा माईलस्टोन, 40 लाख रुग्णांना 340 कोटींची मदत
दुर्धर आजारावर चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळवणे आणि त्यासाठी आर्थिक निधीची उभारणी करणे हे सामान्य माणसासमोरचे मोठे आव्हान असते. इलाजासाठी पैसे गोळा करताना अनेकांना आपला जमीन जुमला आणि सोने नाणे देखील विकावे लागते.अनेकांना आर्थिक विपन्नता येते. महाराष्ट्रातील अनेक नागरिक उपचारासाठी पैसे नसल्यामुळे आजारपण अंगावर काढतात आणि मृत्यूला कवटाळतात. ही समस्या अत्यंत गांभीर्याने घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या कामाला विलक्षण गती दिली. हा निधी गरजूंना उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची विशेष स्थापना केली. अर्ज करण्याची आणि लाभ मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ केली. अक्षरशः लाखो गरजू रुग्णांना या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत मिळाली. ही योजना आणि हा कक्ष मुख्यमंत्र्यांच्या आतापर्यंतच्या कामकाजातला आणि योजना मधला माइल स्टोन मानला जात आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत आहे. गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
महाविकास आघाडीच्या काळात योजना थंडावली
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून या कक्षाच्या कामाला गती दिली. रुग्णसेवेचे जणू व्यसनच असलेल्या मंगेश चिमटे यांनी ही जबाबदारी तितक्याच समर्थपणे पेलली आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला एक मोठा आधार उपलब्ध करून दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून 2 वर्षात जवळपास 40 लाख रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा लाभ घेतला असून 340 कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य वितरीत करण्यात आले आहे,
नवीन आजारांचा योजनेत समावेश
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून राज्यातील गोरगरीब रुग्णांना आजारांवर उपचार घेण्यासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. या माध्यमातून जवळपास 20 आजारांवर उपचार करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात मदत मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे.यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण ,जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.
नोंदणी प्रक्रिया निःशुल्क
मुख्यमंत्री सहायता निधीतुन अर्थसहाय्य मिळवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया निःशुल्क असून रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी टोल फ्री संपर्क क्रमांक 8650567567 देण्यात आला आहे. राज्यातील ज्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना, चॅरिटी हॉस्पिटल, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम या तीन योजनांचा लाभ मिळत नाही अशा, पात्र रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी 3 लाख 60 हजार रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे.
एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष
ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना निधीसाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिझवावे लागतात. अनेकदा अर्ज भरताना चुका झाल्यास नव्याने प्रक्रिया करावी लागते. उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी परवड लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसकॉलवर अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. अर्जदाराने 8650567567 या क्रमांकावर मिस्ड कॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे प्राप्त होते. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अर्ज डाऊनलोड करता येतो. अर्जाची प्रिंट काढून आवश्यक माहितीनुसार तो भरणे, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आणि मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज व कागदपत्रे पी डी एफ PDF फॉरमॅट मध्ये स्कॅन करून PDF फाईल स्वतःच्या मेल वरून [email protected] किंवा cmrf.maharashtra.gov.in या mail id वर पाठवल्यानंतर या योजनेचा लाभ मिळतो.
गोरगरिबांना वरदान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात अनेक कल्याणकारी योजनांना गती आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात थंड्याबस्यात पडलेल्या अनेक योजना कार्यान्वित झाल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गोरगरीब महिलांसाठी आधार ठरली. त्याचप्रमाणे गरीब आणि गरजू नागरिकांसाठी आणि रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हा देवदूता समान ठरला आहे.












Click it and Unblock the Notifications