गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनी छगन भुजबळ यांची अनोखी श्रद्धांजली
Mumbai: भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून हा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांना भाजपच्या तसेच अन्य पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अनेकांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत व्यतीत केलेल्या राजकीय आणि सामाजिक आठवणींना उजाळा दिला.
ओबीसी चळवळीतील पाठीराखा
ओबीसी चळवळीतील माझे पाठीराखा, माझे बंधू, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा आज स्मृतिदिन! त्यांना आपल्यातून जाऊन आज एक दशक पूर्ण झाले. मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या एका मोठ्या वर्गामध्ये अस्मिता आणि स्वाभिमान जागृत करण्याचे खूप मोठे काम त्यांनी केले.

त्यामुळे आजही त्यांचे विचार व कार्य असंख्य उपेक्षितांना, तळागाळातील लोकांना प्रेरणा देत आहे. आज स्मृतिदिनी या लोकनेत्याला विनम्र अभिवादन! असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भजूबळ यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य व्यक्तिमत्व
महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य राजकीय व्यक्तिमत्व, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन अशी भावांजली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्पण केली. संघर्षाचा मूलमंत्र देणारे लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पंकजा मुंडे यांनी घेतले स्मृतिस्थळी दर्शन
राज्याच्या माजी मंत्री आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी बीड मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळी त्यांच्या स्मृतीनस अभिवादन केले. तर "अप्पा, दहा वर्ष झाली तुम्हाला आमच्यातून जाऊन, पण आजही तुम्ही ऊर्जा रूपाने अमच्यातच आहात. ती ऊर्जा कायम लोकसेवेची प्रेरणा देत राहील... स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब (अप्पा) यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र आदरांजली..." असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
मुंडे यांचा 10 वा स्मृतीदिन
गोपीनाथ मुंडे ही भाजपचे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होत. त्यांनी परिस्थितीशी संघर्ष करीत करीत त्यांनी भाजप तळागाळा पर्यन्त पोहोचवली. महाजन आणि मुंडे ही तेव्हा राज्यातील लोकप्रिय जोडी होती. भाजपच्या "माधव" या संकल्पनेला त्यांनी मूर्त रूप दिले. कुशल संघटक ही गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती. राज्याच्या कानाकोपऱ्यात संघर्ष करणाऱ्या अनेक तरुणांना त्यांनी भाजपच्या झेंड्याखाली आणले.
1990 ते 1995 हा काळ त्यांनी विधानसभेत गाजवला. शरद पवार यांच्यावर त्वेषाने तुटून पडणारे नेते ही होपीनाथ मुंडे यांची ओळख होती. 1995 साली राज्यात युतीचे सरकार येताच त्यांच्यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद ही धुरा सोपवण्यात आली. 1999 ते 2009 या काळात ते विरोधी बाकांवर होते.
2009 साली ते पहिल्यांदा खासदार झाले आणि 2014 साली त्यांना दुसऱ्यांदा संधि मिळाली. तेव्हा त्यांची मंत्रिमंडळात निवड झाली होती, मात्र कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांचे अपघाती निधन झाले.
दिलखुलास राजकारणी
दिलखुलास आणि मनमोकळा राजकारणी ही गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती. पक्षाच्या भिंती पलीकडे त्यांची अनेक नेत्यांशी वैयक्तिक मैत्री होती. विशेषता विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय होती.












Click it and Unblock the Notifications