Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महायुती सरकारने केली संभाजीनगरमध्ये विक्रमी गुंतवणूक

Chhatrapati Sambhajinagar Industrial Project : छत्रपती संभाजी नगर हे शहर तसेच जिल्हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. राज्याच्या मध्यभागी वसलेल्या या शहराला मराठवाड्याची राजधानी म्हणता येईल. हे शहर जसे उद्योगांचे केंद्र आहे तसेच ते चळवळींचे देखील केंद्र आहे. महाराष्ट्राला दिशा देणारी अनेक आंदोलने आणि चळवळी या शहरातून सुरू झाल्या. औद्योगिक दृष्ट्या देखील या शहराला महत्त्वाचे स्थान आहे. अनेक नामांकित उद्योगांनी आपली उत्पादन केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे सुरू केली आहेत. त्या माध्यमातून शहर, जिल्हा आणि लगतच्या जिल्ह्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. वैद्यकीय सुविधामुळेही आजूबाजूच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक छत्रपती संभाजीनगर शहरात येत असतात.

या शहराने आणि जिल्ह्याने देखील अपवाद वगळता शिवसेना तसेच शिवसेना-भाजप युतीला चांगले पाठबळ दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या शहरावर विशेष प्रेम होते. एकनाथ शिंदे यांनीही आपल्या सरकारच्या माध्यमातून शहर आणि जिल्ह्याला झुकते माप दिल्याचे दिसून येत आहे. विशेषतः उद्योगधंद्यांच्या बाबतीत शहरात अधिक गुंतवणूक व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.

Cm Eknath Shinde

टोयोटा किर्लोस्करची 20 हजार कोटींची गुंतवणूक

छत्रपती संभाजीनगर शहरात औद्योगिक वातावरण आहे. अनेक कंपन्यांची उत्पादन केंद्रे याच शहरात औद्योगिक वसाहतीमध्ये आहेत. नमनवे उद्योग येथे गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने टोयोटा किर्लोस्कर ग्रुप यांच्याशी समझोत्याचा करार केला असून ही कंपनी शहरात वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून 8000 थेट आणि 12000 अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. वाहन उद्योग क्षेत्रात होणारी ही गुंतवणूक राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

अथर एनर्जी करणार 2 हजार कोटींची गुंतवणूक

ऊर्जा आणि ऊर्जा विषयक उद्योग राज्याच्या गतिमान विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हे लक्षात घेऊन ऊर्जा विषयक गुंतवणुकीला एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विशेष प्राधान्य दिले. छत्रपती संभाजीनगर येथे गुंतवणूक करण्यासाठी अथर एनर्जी यांच्याशी करार करण्यात आला असून ही कंपनी छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. येथील बिडकीन रोड मध्ये आपला प्रकल्प उभारण्याची संपूर्ण तयारी अथर एनर्जी या कंपनीने केली आहे.

811 कोटींची अमृत योजना कार्यान्वित

छत्रपती संभाजीनगर हे औद्योगिक शहर असले तरी शहर आणि जिल्हाभरात पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. ज्या गतीने पश्चिम महाराष्ट्रातील शहरात पाणीपुरवठ्याच्या सुविधा राबवण्यात आल्या ती गती छत्रपती संभाजी नगर शहराला पकडता आलेली नाही. हे लक्षात घेऊन प्रत्येक घरी स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्यासाठी अमृत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. नजीकच्या काळात शहरातील प्रत्येक घरात पिण्यायोग्य पाण्याचा मुबलक पुरवठा करण्याकडे सरकारने लक्ष दिले आहे. या योजनेसाठी तब्बल 811 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक बस डेपो

कार्बन उत्सर्जन ही जगभरातील समस्या आहे. वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे जागतिक तापमानात वाढ झाली असून सर्वच देशांसमोर हे एक आव्हान बनले आहे. ग्लोबल वॉर्मिंग नावाने ही समस्या ओळखली जाते. त्यावर मात करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय समोर आला. आज सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात चालवण्यात येणाऱ्या बसेस विजेवर आधारित असतील याची खबरदारी घेण्यात येत आहे. याच प्रयत्नाच्या अंतर्गत जाधववाडी येथे इलेक्ट्रिक बस डेपो उभारण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून विजेवर चालणारी वाहने खरेदी करण्यात येत असून त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

अत्याधुनिक स्टेडीयमची चाहूल

मराठवाडा हा कष्टाळू मुलांसाठी प्रसिद्ध आहे. सैन्य भरती, पोलीस भरती आदीसाठी येथील तरुण विशेष प्रयत्नशील असतात. मराठवाड्यातील मुलांमध्ये क्रीडा नैपुण्य अधिक प्रमाणात दिसून येते. मात्र पुरेशा मार्गदर्शनाचा अभाव आणि क्रीडाविषयक सुविधांची वानवा यामुळे येथील मुलांना क्रीडा क्षेत्रात अधिक प्रगती करता येत नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ही बाब ध्यानात घेतली.

छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी यावर सखोल विचार विनिमय करून शहर परिसरात भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत आमखास मैदान आणि गारखेडा येथे स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव क्रीडा मंत्रालयाला सादर करण्याचे निर्देश दोन्ही मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याआधी ही जागा सभा, सोहळे यांच्यासाठी वापरण्यात येत होती मात्र आता स्टेडियमची उभारणी होणार असल्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील मुलांसाठी एक चांगली क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहे.

शहराचे रुपडे पालटतेय

छत्रपती संभाजी नगर शहराचे रूपडे पालटण्यासाठी ही एकनाथ शिंदे यांच्या सरकारने भरीव निधी दिला. बीड बायपास रस्त्यासाठी 100 कोटी रुपये राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. देवळी विभागातील रस्त्याची दर्जान्नती करण्यात आली आहे. झाल्टा फाटा ते संभाजीनगर स्थानक हा सात ते आठ किलोमीटरचा रस्ता अद्यावत करण्यात आला आहे. देवलाई येथील भूमिगत रस्ता शहराच्या सौंदर्यात भर घालतो आहे. अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येत आहेत. शिव पुतळा उभारणी, सभागृह, डोम, अंतर्गत रस्त्यांची दर्जोन्नती असे विविध प्रकल्प शहरात राबविण्यात आले आहेत. त्यामुळे शहराला आगळा साज मिळाला आहे.

छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने प्रयत्न केले आहेत. क्रीडा, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मेहनत घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर शहर परिसरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार असून जिल्ह्यासह मराठवाड्यातील तरुणांना रोजगाराच्या शोधात पुण्या मुंबईकडे धाव घ्यावी लागणार नाही हे निश्चित आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+