Crime: फ्लॅटसाठी तगादा; पतीचा प्राध्यापक पत्नीला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, संभाजीनगरात थरार!
chhatrapati sambhajinagar Crime : हुंड्यासाठी अनेक मुलींचा बळी घेतला जात असल्याच्या घटना समाजात सातत्याने होत आहेत. तर दिवसेंदिवस या घटनेत सातत्याने वाढ होतच आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे या घटनेने तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही घटनेची दाहकता कमी होत नाही, तोच आता छत्रपती संभाजीनगरमधील उल्कानगरी परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाचे हे आणखी एक भीषण उदाहरण असल्याचे मानले जात आहे.
4BHK ऐवजी 2BHK फ्लॅट घेऊन दिल्याच्या रागातून, पतीने आपल्या प्राध्यापक पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व पत्नीच्या आईच्या डोळ्यादेखत घडले तर जावयाने आपल्या सासूवर देखील हल्ला केला. या घटनेनंतर आता आरोपी पती पवन विष्णू ढाकणेसह त्याच्या आई-वडिलांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?, जाणून घ्या टाईमलाईन?
विवाह आणि छळाची सुरुवात
लग्नानंतर अवघ्या एका महिन्यानेच पतीने पत्नीचा छळ सुरू केला. तो 4BHK फ्लॅटसाठी तगादा लावत होता, पण माहेरच्यांनी 2BHK फ्लॅट घेऊन दिला. यावरून छळ वाढतच गेला.
नोकरीवरून छळ
आरोपीच्या आईने, म्हणजेच सासूने, "मी मुलांची काळजी घेते, तू नोकरी कर," असे सांगत पत्नीला मानसिक त्रास दिला. एवढंच नाही, तर तिच्या डोक्यात स्टीलची बाटलीही मारल्याचे समोर आले आहे.
पतीचे अनैतिक संबंध
2021 मध्ये पत्नीला पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या मुलीचे फोटो सापडले. यावरून त्यांच्यात मोठे वाद झाले. त्यावेळी पतीने "मला दुसरे लग्न करायचे आहे," असे म्हणत पत्नीला वारंवार धमकावले.
हत्येचा प्रयत्न
हा छळ असह्य झाल्यामुळे पत्नीची आई जावयाला समजावण्यासाठी घरी आली होती. पण, तिच्यासमोरच पतीने पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर आरोपीने सासूवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
गुन्हा दाखल
या प्रकारानंतर पीडित पत्नीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
संभाजीनगर शहर हादरले!
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अशा घटना पुन्हा समोर येत आहेत. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात हुंड्यासाठी होणाऱ्या छळाची आणि कौटुंबिक हिंसाचाराची भीषणता पुन्हा एकदा उघड झाली आहे. विशेष म्हणजे प्राध्यापक महिलेसोबत अशी घटना घडल्याने उच्चशिक्षित महिलांना देखील अशा घटनांचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले. एकदंरीत या घटनेने संभाजीनगर शहर हादरले आहे.












Click it and Unblock the Notifications