छगन भुजबळांचा पहिल्यांदाच थेट अजित पवारांना सवाल; म्हणाले, मला उमेदवारी का दिली..?
मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. शपथविधीलाही हजर न राहता ते थेट नाशिकला आले होते. त्यावेळीही त्यांनी आपली नाराजी थेट प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. आता मुंबईत कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बोलताना, तर त्यांनी थेट अजित पवार यांनाच सवाल केला आहे. छगन भुजबळांच्या या भुमिकेमुळे राजकीय आखाड्यात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

ओबीसी नेत्यांच्या बैठका
छगन भुजबळ हे सध्या ओबीसी नेत्यांच्या बैठका घेत आहेत. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. राज्यभर त्यांच्या बैठका सुरु आहेत. या सर्वांशी बोलून आपण भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. माझ्यावर अन्याय झाला, ही कार्यकर्त्यांची भावना आहे. ती भावना माझे कार्यकर्ते राज्यभर नेणार आहेत. त्यानंतर मी माझी भूमिका जाहिर करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अजित पवारांना सवाल
आज झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर छगन भुजबळ प्रसार माध्यमांशी बोलले. त्यांनी आज पहिल्यांदाच थेट अजित पवारांना सवाल केला. ते म्हणाले, तरुणांना संधी द्यायची म्हणून मला डावलल्याचे सांगितले गेले. तरुणांनाच संधी द्यायची होती तर, मला विधानसभेची उमेदवारी का दिली..? असा थेट सवाल त्यांनी अजित पवारांना विचारला.
ज्येष्ठतेची व्याख्या काय?
छगन भुजबळ म्हणाले, किती वर्षांच्या व्यक्तीला तरुण म्हणायचे..? नेत्यांनी हा निकष आधी सांगितला पाहिजे. ६७ वर्षांच्या व्यक्तीला तरुण म्हणायचे का..? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तरुणाला संधी द्यायचीच, होती तर मला का विधानसभा निवडणुकीत उभे केले? मला आधीच सर्व सांगायला पाहिजे होते. तरुणांना संधी देताना काही वरिष्ठ लागतात. त्यासाठीही नियम असतात. पण या नियमांकडे डोळेझाक केली गेली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
राज्यसभेची ऑफर
भुजबळ म्हणाले, अगोदर लोकसभा निवडणुकीत मला अडथळा आणला गेला. त्यानंतर दोन वेळा राज्यसभेला संधी होती, तेव्हाही डावलले गेले. आता मला राज्यसभेवर जा, असं सांगितलं जातंय. मी आता राज्यसभेवर गेलो तर मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मी राजीनामा दिला तर मला ज्यांनी मते दिली त्यांचे काय..? असा प्रश्नही भुजबळांनी उपस्थित केला.












Click it and Unblock the Notifications