Chhagan bhujbal : ओबीसी आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या: छगन भुजबळ आक्रमक, हा दिला इशारा...
Chhagan bhujbal on Obc Reservation : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात वांगदरी गावात भरत महादेव कराड या तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात एकीकडे मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरुन संघर्ष निर्माण झाला आहे, या मुद्द्यावर राज्याचे मंत्री तथा ओबीसींचे सर्वात मोठे नेते छगन भुजबळ यांनी आपली कडक भूमिका वारंवार व्यक्त केली. त्यानंतर त्यांना मराठा समाजातील संबंधित नेत्यांकडून प्रत्युत्तरही देण्यात येत आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाच्या मुंबई मोर्चावेळी केलेल्या मागण्यांची पुर्तता केल्यानंतर ओबीसी समाजात संतापाची लाट आहे. ओबीसींना आपले आरक्षण संपुष्टात येत आहे असे वाटत असून त्यानंतर तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे वांगदरी या गावातील तरुणाने नदीपात्रात उडी घेत स्वःतला संपवले, त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी रेणापूर येथील संबंधित तरुणाच्या घरी जाऊन भेट घेतली. पीडित कुटुंबाचे सांत्वन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, "भरत कराडने आरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली पण ओबीसींचे आरक्षण धोक्यात आणले तर आणखी अन्याय होईल." त्यांनी मराठा समाजाला कुणबी स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली असून, ओबीसींच्या कोट्याला हात लावू नये, असा ठाम इशारा दिला.
आम्ही काय पाप केले? - भुजबळ
छगन भुजबळ म्हणाले, "आधीच मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे, आता ओबीसींच्या कोट्यातून देणे चुकीचे आहे.ओबीसी समाजातील गरीबांची अवस्था बिकट आहे.कधी म्हणतात कुणबी म्हणून द्या, कुणबींना द्यायला हरकत नाही, पण सर्व मराठ्यांना ओबीसी कोट्यात आणणे आम्ही मान्य करणार नाही.""आमच्या मुलाबाळांनी नोकऱ्या घ्यायच्या नाहीत का? आम्ही काय पाप केले आहे? तुम्हाला वेगळे आरक्षण हवे तर घ्या, पण ओबीसींचा हिस्सा कमी करू नका." "ओबीसी समाजात आधीच अठरा पगड जाती आहेत. त्यात आणखी गर्दी झाल्यास गरीब ओबीसींना न्याय मिळणे कठीण होईल.
तर... मोठा संघर्ष होईल - भुजबळ
भुजबळ यांनी मराठा समाजाला स्वतंत्र कोटा देण्याचा पुनरुच्चार केला, पण ओबीसींच्या कोट्यावर गदा आणल्यास मोठा संघर्ष होईल, असा इशाराही दिला. यावेळी त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी, कार्यकर्तेही उपस्थित होते.












Click it and Unblock the Notifications