Chandrasekhar Bawankule Biography : मंत्रिपदाची शपथ घेतलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचा राजकीय प्रवास
Chandrasekhar Bawankule Profile in marathi : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जबाबदारीचे मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांचा ४० हजार मतांनी पराभव करून मतदारसंघावर झेंडा फडकवला.
नागपूर जिल्हा परिषदेच्या राजकारणापासून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. 2004 साली ते पहिल्यांदा भाजपचे आमदार झाले आणि 2009 तसेच 2014 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका तेली कुटुंबात जन्मलेल्या बावनकुळे यांनी अल्पावधीतच प्रचंड मोठा जनसंपर्क निर्माण केला. ते विज्ञान शाखेचे उच्च पदवीधर आहेत. 2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. अत्यंत कार्यक्षमतेने त्यांनी ऊर्जा मंत्रालय सांभाळले. त्यांच्या नेतृत्वातच महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागात चांगली प्रगती झाली. 2019 साली कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला थोडा धक्का बसला.. बावनकुळे यांची उमेदवारी कापण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष होता. मात्र बावनकुळे यांनी कुठेही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त होऊ दिली नाही.

कालांतराने चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेवर निवडण्यात आले तसेच भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ही त्यांच्याकडे देण्यात आली. बावनकुळे यांच्यावर देण्यात आलेल्या या जबाबदाऱ्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद त्यांनी अत्यंत जबाबदारीने सांभाळले आणि महाराष्ट्रभर झंझावती दौरे काढले. प्रत्येक जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभारली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कामठी मतदारसंघात पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली. त्यांचा सामना काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्याशी झाला. सुरेश भोयर हे चंद्रशेखर बावनकुळे यांचे शिष्य आहेत. आपल्या राजीनामामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर बावनकुळे यांनीच भोयर यांना निवडून आणले होते. मात्र नंतर त्यांनी काँग्रेसची घरोबा केला. विशेषतः माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्याशी भोयर यांचे संबंध खूप चांगले होते.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले असून त्यांच्या उपस्थितीत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र भाजपात सुरू झाले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना कोणते खाते दिले जाते याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.












Click it and Unblock the Notifications