खडसेंच्या राजकारणाला चीतपट करणारे चंद्रकांत पाटील; आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख
फक्त हिमतीच्या जोरावर भल्याभल्यांना भिडणाऱ्या शिवसैनिकांनी शिवसेना हे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात नेले., जिल्हा जिल्ह्यात अशी तडफदार नेतृत्व उभी करणे, हेच शिवसेनेचे खऱ्या अर्थाने यश म्हणावे लागेल. अशा शिवसैनिकांनी घराणेशाहीचे मजबूत किल्ले अक्षरशः उध्वस्त करून टाकले. वर्षानुवर्षे जिल्ह्यावर ठाण मांडून असलेल्या नेत्यांना अक्षरशः पाणी पाजले. सामान्य घरातून आलेले हे शिवसैनिक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले असाच एक शिवसैनिक म्हणजे जळगाव जिल्ह्याचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील.
एक सामान्य शिवसैनिक म्हणून चंद्रकांत पाटील यांनी संघटनेत कामाला सुरुवात केली. कामाच्या जोरावर हळूहळू लोकसंपर्क वाढत गेला आणि जळगाव जिल्ह्यात चंद्रकांत पाटील हे एक प्रस्थ बनले. आक्रमक शिवसैनिक ही चंद्रकांत पाटील यांची खरी ओळख आहे. जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात चंद्रकांत पाटील यांनीच शिवसेनेची मजबूत बांधणी केली. जळगाव जिल्हा माजी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला. एकेकाळी हा संपूर्ण जिल्हा एकनाथ खडसे यांच्या ताब्यात होता. जिल्ह्यातील बहुतेक सत्तास्थाने खडसे यांच्याकडेच होती. खडसे यांचे वर्चस्व इतके जबरदस्त होते की भाजपचे आमदार असूनही गिरीश महाजन यांना जिल्ह्यात फारसा संचार करण्याची संधी मिळत नव्हती. पण एकनाथ खडसे आणि त्यांच्या प्रचंड सामर्थ्य शक्तीला खऱ्या अर्थाने भिडले ते चंद्रकांत पाटील.

एकनाथ खडसे यांच्या कन्येचा पराभव
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ. शिवसेना जिल्हाप्रमुख असतानाही चंद्रकांत पाटील यांनी 2019 मध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढत दिली. युतीत हा मतदारसंघ भाजपला सुटला होता. अपक्ष म्हणून लढणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांची सुकन्या रोहिणी खडसे यांचा दारुण पराभव केला आणि विधानसभेत प्रवेश केला.
एकनाथ शिंदे यांना पाठींबा
2019 साली उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख होते. ते पुढे मुख्यमंत्रीही झाले परंतु बहुसंख्य आमदार आणि मंत्री यांची सलगी राहिली ती एकनाथ शिंदे यांच्याशीच. शिंदे यांच्या बंडाच्या काळात शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांनी शिंदे यांनाच पाठिंबा देणे पसंत केले. अपक्ष म्हणून निवडून आलेले चंद्रकांत पाटील हे देखील शिंदे यांना पाठबळ देण्यात आघाडीवर होते.
संजय गांधी निराधार योजनेचा ४० हजार जणांना लाभ
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने ताकद मिळाली. चंद्रकांत पाटील यांनी आमदारकीचा कारभार पाहतानाच संघटना बांधणीकडे ही पुरेसे लक्ष दिलेले आहे. त्यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातूनच रावेर तालुक्यात तीनशे किलोमीटर लांबीचा शेतकरी मार्ग उभारण्यात आला. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यातून संजय गांधी निराधार योजना मतदारसंघात जोरदारपणे राबवण्यात आली आणि चाळीस हजार नागरिकांना याचा लाभ मिळवून देण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात शंभर कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना चंद्रकांत पाटील यांनी राबवून घेतली तसेच 12 कोटी रुपयांच्या खर्चातून बोदवड परिसर जलसिंचन योजनेला बोदवड तालुक्यात गती देण्यात आली. याबरोबरच रस्ते, पाणी, सरकारी योजना तळागाळात पोहोचवण्यासाठीही चंद्रकांत पाटील यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद म्हणावे असेच आहेत.
३६ हजार महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांची माईल स्टोन योजना म्हणून ओळखली जाते. महायुतीच्या सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघात ही योजना अत्यंत परिणामकारकपणे राबवली आणि आपल्या मतदारसंघातील महिलांना योजनेचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या मतदारसंघातील तब्बल 36 हजार 834 महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.
एकनाथ खडसे यांची विश्वासार्हता धोक्यात
2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून पुन्हा चंद्रकांत पाटील यांना संधी दिली आहे. यावेळीही चंद्रकांत पाटील यांचा सामना एकनाथ खडसे यांचा कन्या रोहिणी खडसे यांच्याशीच होणार आहे. मागील निवडणुकीत मुक्ताईनगरची ही लढत अत्यंत चुरशीची झाली होती आणि संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले होते. 2019 नंतर एकनाथ खडसे यांनी वेळोवेळी आपली राजकीय भूमिका बदललेली आहे. ते आज कोणत्या पक्षात आहेत हे त्यांना स्वतःला सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे.त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे या भाजपाच्या केंद्रात मंत्री आहेत आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादीचे तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. दुसरीकडे आपण भाजपात प्रवेश केल्याचा दावा सुद्धा एकनाथ खडसे यांच्याकडून केला जात आहे. स्वतःच्या कृतीतून एकनाथ खडसे यांनी आपली राजकीय विश्वासार्हताच धोक्यात आणली आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातील सध्याचे राजकीय परिस्थिती पाहता ती चंद्रकांत पाटील यांना पूरक असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.












Click it and Unblock the Notifications