चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश; "नकली आखाड्यातून खऱ्या मैदानात आलो" – चंद्रहार पाटील
राज्यातील कुस्ती विश्वात 'डबल महाराष्ट्र केसरी' म्हणून प्रसिद्ध असलेले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील प्रभावशाली नेते चंद्रहार पाटील यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा ठाण्यात मोठ्या जल्लोषात पार पडला आणि त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते.

"खऱ्या मैदानात आलो" - चंद्रहार पाटील
पक्षप्रवेशानंतर बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले, "आज मी एक नकली आखाडा सोडून खऱ्या आखाड्यात आलो आहे. माझ्या या निर्णयामागे केवळ वैयक्तिक राजकारण नाही, तर क्रीडा क्षेत्राला आणि विशेषतः कुस्तीला न्याय मिळावा यासाठी मी हा निर्णय घेतला आहे."
पुढे ते म्हणाले, "माझा खरा आक्षेप हा महाविकास आघाडीच्या ढोंगी धोरणांवर होता. ज्या पद्धतीने काही नेत्यांनी शेतकऱ्याच्या पोराला डावलून, घराणेशाही पुढे रेटली, त्याविरोधात मी उभा राहिलो. २०२४ लोकसभा निवडणुकीत मला काँग्रेसचा विरोध असूनही उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली होती, मात्र पक्षात अंतर्गत संघर्ष आणि दिशाहीन नेतृत्वामुळे पराभव झाला."
"शिवसेना शिंदे गटात पद नको, काम करण्याची इच्छा"
पाटील यांनी स्पष्ट केले की, "माझा शिंदे साहेबांकडे कोणताही पदाचा आग्रह नाही. मी क्रीडा क्षेत्रासाठी, मातीतल्या खेळांना मदत मिळावी म्हणून या गटात आलो आहे." सांगली जिल्ह्यात घराणेशाही माजल्याचा आरोप करत, "इथं केवळ काही घराण्यांचे लोकच पुढे जात आहेत, सामान्य कार्यकर्त्यांना संधी नाही," असंही त्यांनी परखडपणे नमूद केलं.
एकनाथ शिंदेंचा मिश्कील टोला आणि समर्थन
या सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांचा गौरव करत म्हटलं, "चंद्रहार पाटील आता खोट्या लोकांकडून खऱ्या लोकांकडे आले आहेत. त्यांनी कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा लौकिक वाढवला आहे. जरी मी स्वतः पैलवान नसलो, तरी २०२२ मध्ये काही राजकीय आखाड्यांमध्ये डावपेच टाकून विरोधक चारीमुंड्या चीत केले. त्यामुळे अशा खेळाडूंना राजकीय पाठबळ देणं ही आमची जबाबदारी आहे."
त्यांनी यावेळी चंद्रहार पाटील यांच्या सीमेवरील जवानांसाठी रक्तदान शिबीर घेण्याच्या संकल्पाचंही कौतुक केलं आणि सांगितलं की, "दिल्ली काय, तर काश्मीरमध्येसुद्धा असं शिबीर आयोजित केलं जाईल."
चंद्रहार पाटील यांचा राजकीय प्रवास थोडक्यात:
दोन वेळा महाराष्ट्र केसरीचा मानकरी.
2008 मध्ये सांगली जिल्हा परिषदेत पहिल्यांदा निवडून आले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी, पण पराभव पत्करावा लागला.
त्यानंतर शिवसेनेत राज्य संघटकपदाची जबाबदारी.
आता शिवसेना शिंदे गटात जोरदार प्रवेश.












Click it and Unblock the Notifications