तुम्हाला गोळ्या घालीन..! गडकरींनी दिला होता सज्जड दम; स्वतःच सांगितला किस्सा...
नितीन गडकरी कायम चर्चेत असतात. कधी आपल्या कामाने तर कधी रोखठोक बोलण्याने... गडकरी सध्या अशाच एका विधानाने सध्या चर्चेत आलेय. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना गडकरींनी मेळघाटातील रस्ते कसे तयार केले होते, त्याचा किस्सा गडकरी सांगत होते. नागपूरातील एका कार्यक्रमात गडकरींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत, अधिकाऱ्यांना कसा दम दिला होता, तो संपूर्ण घटनाक्रमच उलगडून सांगितला. आपण वनखात्याच्या अधिकाऱ्यांना थेट गोळ्या घालण्याची धमकी दिली होती, असं सांगत गडकरींनी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची अजून एक बाजू उलगडून दाखवली.
नेमका काय होता किस्सा
राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्या काळात गडकरी आपल्या राजदूत या मोटरसायकलवर एकदा मेळघाटात फिरले. तेथे अजिबात रस्ते नव्हते. अधिकारीही काम करत नव्हते. ही बाब मुख्यमंत्र्यांना समजल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांना बोलावून घेत, त्यांची बैठक घेतली. रस्त्याअभावी लहान मुले कुपोषणाने मरत असतानाही रस्त्यांना परवानगी का देत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री मनोहर जोशींनी अधिकाऱ्यांना खडसावलं. पण तरीही काम होईना. शेवटी गडकरींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत, तुम्ही हे काम माझ्यावर सोडा म्हणत, रस्त्यांचा विषय स्वतःच्या हातात घेतला.

गडकरींनी दिला अधिकाऱ्यांना दम
त्यानंतर गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं की, मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो. मी चुकून राजकारणात आलो. परंतु, आता मी पुन्हा नक्षलवादी चळवळीत गेलो, तर तुम्हाला गोळ्यांनी फुंकल्याशिवाय राहणार नाही. गडकरींनी हा किस्सा सांगितल्यावर उपस्थित अवाक झाले. गडकरी पुढे म्हणाले की, त्यानंतर मी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत जे- जे केलंय, ते इकडे सांगू शकणार नाही. या सगळ्यानंतर मेळघाटातील रस्त्यांचे काम पूर्ण झाले, असे नितीन गडकरी सांगितल्यावर गडकरींच्या स्वभावाचा अजून एक पैलू उपस्थितांसमोर उलगडला.
चांगल्या माणसाला सन्मान नाही: गडकरी
सरकारी प्रक्रियेत एखाद्याला अधिकाऱ्याला शिक्षा करायची असली, की ते फार कठीण काम आहे. कारण एखाद्याने ती फाईल दाबून धरली ती फाईल वर जात नाही, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. यावेळी त्यांनी सरकारची व्याख्याही सांगितले. ते म्हणाले की, चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही म्हणजे सरकार, असे गडकरी यांनी म्हटले.












Click it and Unblock the Notifications