केंद्राचे महाराष्ट्राला मोठे गिफ्ट, ठाणे आणि पुण्यात मेट्रो प्रकल्पासांठी हजारों कोटींची तरतूद
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुणे आणि ठाण्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या शहरांत मेट्रोचे जाळे अजून घट्ट आणि गतिमान करण्यात येणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल केंद्र सरकारच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे.

असा आहे ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प
सुमारे 12 हजार 200 कोटी रुपये खर्चाच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे कॉरिडोरला मंजुरी मिळाली आहे. एकूण 29 कि.मी. लांबीच्या ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा 26 कि.मी. लांबीचा मार्ग हा उन्नत असून 3 कि.मी. लांबीचा मार्ग भूमिगत राहणार आहे.
उन्नत मार्गावर 20 तर भूमिगत मार्गावर 2 अशा 22 स्थानकांचा समावेश आहे.. अंदाजे 6. 47 लाख प्रवाशांना दररोज या मेट्रो रेल्वे सेवेचा लाभ होणार असून सन 2029 पर्यंत मेट्रो सेवा कार्यन्वित होणार आहे. ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदाणी इस्टेट, कोलशेत, साकेत आदी भाग या मेट्रो रेल्वे सेवेने जोडला जाणार असल्याने प्रवाशांना किफायतशीर, जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
पुणे मेट्रोचाही विस्तार
पुण्यातील मेट्रो फेज-1 प्रकल्पाच्या विस्तारालाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. स्वारगेट ते कात्रज या 5.46 किमी लांबीच्या विस्तारास ही मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2,954.53 कोटी रुपये लागणार असून तो 2029 सालापर्यंत पर्यंत कार्यान्वित होणार आहे.
पुणे मेट्रो फेज 1 चा विस्तारीत प्रकल्प असेल. त्याची लांबी 5.46 किमी पर्यंत असेल. यामध्ये तीन भूमिगत स्टेशन असतील. मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर आणि कटराज या मुख्य भागांना ही मेट्रो जोडणार आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सूटका करण्यासाठी, सहज आणि गतिमान प्रवाशासाठी हा नवीन पर्याय असेल.पुणे आणि ठाणे मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमुळे केंद्राचे राज्य सरकारने आभार मानले आहेत.












Click it and Unblock the Notifications