मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणार..? लाँबिंग सुरु; 'त्या' दोन नेत्यांना शिंदेंनी भेट नाकारली
अगोदर शनिवार, मग रविवार आणि आता तर मंत्रिमंडळाचा हा विस्तारही लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्बेत नाजूक असल्याने हा विस्तार होतोय की नाही, ही शंका असताना आता मंत्रिमंडळावर एकमत होत नसल्याचे कारणही समोर आले आहे. मंत्रीपद मिळविण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडे सध्या जोरदार लाँबिंग सुरु आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी त्याच्याच पक्षातील दोन नेत्यांना भेट नाकारल्याने चर्चा वाढल्या आहेत.

अडवाणी यांची तब्बेत बिघडली
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्बेत सध्या बिघडली आहे. त्यांची तब्बेत नाजूक असल्याच समजते. त्यांच्यावर सध्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळेच उद्या होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का, ही शंका आहे. दुसरीकडे शपथविधीसाठी भाजपचे केंद्रातील दिग्गज नेते हजेरी लावणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, अडवाणी यांची तब्बेत खराब असल्याने ते नेते येऊ शकणार नाही. त्यामुळेच उद्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याद्या होईनात फायनल
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? या प्रश्नाचे ठोस उत्तर अजूनही मिळत नाही. महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्याआधी म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा दिवस आहे. 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बोलल जातंय. दुसरीकडे महायुतीत भाजपची यादी फायनल झाल्याचे सांगितले जात असले तरी अजित पवार व एकनाथ शिंदे गटाची यादी अजूनही फायनल झाली नसल्याचे सांगण्यात येते. यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाची सध्या जोरदार लाँबिंग सुरु आहे. भाजपमधील इच्छुकही देवेंद्र फडणवीसांच्या भेटण्यासाठी सागर बंगल्यावर येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याही भेटी त्यांचे आमदार घेत आहेत. शुक्रवारी रात्री उशीरा 1.30 वाजेपर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली.
वर्षा आणि सागरवर गर्दी
संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, भरत गोगावले, बालाजी किणीकर यांचा शिंदे गटाच्या यादीत समावेश असल्याचे समजते. संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना गेल्यावेळी संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांना यंदातरी संधी मिळावी म्हणून या नेत्यांची लाँबिंग सुरु आहे. दुसरीकडे भाजपही काही नव्या आमदारांना संधी देण्याची शक्यता आहे. गिरीष महाजन, राधाकृष्ण विखे यांची नावे भाजपच्या यादीत नसल्याच्याही बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. त्यामुळे खरे काय आणि खोटे काय, हे समजण्यास मार्ग नसल्याने इच्छुकांनी देव पाण्यात घातल्याचे पहायला मिळत आहे.
शिंदेंनी नाकारली दोन नेत्यांची भेट
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या पक्षातील इच्छुकांची गर्दी वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी काही नेत्यांना भेट दिली, तर काहींना ही भेट नाकारण्यात आल्याची माहिती आहे. अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदेंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती, पक्षातील काही नेत्यांनी दिली. दिपक केसरकर, तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. काल पाच तास थांबून ही एकनाथ शिंदे यांनी भेट दिली नसल्याने दोन्ही माजी मंत्र्यांना निराश होऊन परतावे लागले. या दोघांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही अशी सूत्रांची माहीती आहे.












Click it and Unblock the Notifications