बदलापूर प्रकरण : हायकोर्टाचे पोलिस आणि प्रशासनावर ताशेरे
Badlapur School Girl Rape Case : बदलापूर प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल घेण्यात आली, कोर्टाने सुमोटो याचिका दाखल केली असून आज या प्रकरणाची तातडीची सुनावणी सुरु झाली. या सुनावणीवेळी कोर्टाने शाळा प्रशासन आणि पोलिसांना कडक शब्दात खडेबोल सुनावले आहेत. या गुन्ह्यात एका मुलीचं स्टेटमेंट घेण्यात आलं. मग दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट का घेतलं नाही? असा सवाल करत आजच्या आज दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा, असे आदेश हायकोर्टाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांना दिले. तसेच तुमच्याकडून कारवाई का झाली नाही असा सवाल महाधिवक्त्यांना देखील केला, यावर ते निरुत्तर झाले.
न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. यावेळी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ हे सरकारकडून बाजू मांडत आहेत. तर एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग आणि सुधाकर पठारे हे अधिकारी सुद्धा कोर्टात उपस्थित आहेत.

महाधिवक्ता निरुत्तर
न्यायमूर्तींनी महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यावर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. पीडीत मुलांच्या पालकांचे जबाब नोंदवलेत का? बदलापूर पोलीसांनी केलं काय?, असे सवाल विचारताच महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ निरुत्तर झाल्याचे दिसून आले. बदलापूर पोलिसांनी याप्रकरणात काहीच कारवाई केल्याचे दिसत नाही. इतक्या गंभीर प्रकरणात पोलीसांचा हा अक्षम्य हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. कारवाईचे आदेश देताना आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही खंडपीठाने राज्य सरकारला दिला.
पीयूष गोयल यांनी केला घटनेचा निषेध
केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईतील भाजप खासदार पीयूष गोयल यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. आरोपींना कठोर शिक्षा करून लवकरात लवकर करावी, असे ते म्हणाले. असे गुन्हे करणाऱ्या सर्वांच्या मनात शिक्षेची भीती निर्माण झाली पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपींना लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा होईल, अशी आशा आहे. असे ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
बदलापूर येथील शाळेत चौथीच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बदलापुरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बदलापुरकरांनी या घटनेच्या निषेधार्थ उग्र आंदोलन केले. रेल्वे सेवा देखील अनेक तासांसाठी ठप्प झाली होती. या मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी एका शाळेतील सफाई कर्मचा-याला अटक केली आहे.












Click it and Unblock the Notifications