BMC Election 2026:महायुतीचा 'व्हिजन मुंबई' वचननामा; पाणीपट्टी स्थगितीपासून घरांपर्यंत घोषणांचा धडाका
Mahayuti Vision Mumbai Manifesto : मुंबईच्या विकासाचा नवा रोडमॅप मांडताना महायुतीने 'वचननामा' जाहीर केला आहे. सुमारे 2 लाख नागरिकांच्या सूचनांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित प्रश्नांवर भर देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या वचननामाच्या जाहीर करताना उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.

(Photo Credit : @Dev_Fadnavis)
१. महिला सक्षमीकरण: 'लाडकी बहीण' आता बेस्टमध्येही!
राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेचे यश पाहता, महायुतीने मुंबईतील महिलांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत:
बेस्ट प्रवास सवलत : 'माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना बेस्ट बस प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाईल.
आर्थिक स्वावलंबन : महिला लघु उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
२. पाणीपट्टी आणि नागरी सुविधा: ५ वर्षांचा दिलासा
मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या पाणीपट्टी वाढीबाबत महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे.
पाणीपट्टी स्थगिती : पुढील ५ वर्षांसाठी मुंबईतील पाणीपट्टी वाढीला पूर्णपणे स्थगिती देण्यात येईल.
पाणीपुरवठा प्रकल्प : मुंबईचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा हे प्रकल्प आगामी ५ वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
३. गृहनिर्माण आणि पुनर्विकास: 'झोपडपट्टीमुक्त मुंबई'चे स्वप्न
मुंबईतील घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीने अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना मांडल्या आहेत:
३५ लाख घरांची निर्मिती : मुंबईत २० ते ३५ लाख नवीन घरांची निर्मिती करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
धारावी पुनर्विकास : धारावीचा विकास DRP मार्फत केला जाईल आणि धारावीकरांना तेथेच ३५० चौरस फुटांची हक्काची घरे दिली जातील.
पागडीमुक्त मुंबई : मुंबईतील जुन्या पागडी घरांचा प्रश्न सोडवून मुंबई पागडीमुक्त करण्यासाठी विशेष योजना राबवली जाईल.
सफाई कामगारांना घरे : पालिकेत काम करणाऱ्या सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
४. शिक्षण आणि आरोग्य: जागतिक दर्जाच्या सुविधा
बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ : मुंबईत आरोग्य क्षेत्रातील शिक्षणाला चालना देण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नवीन वैद्यकीय विद्यापीठ स्थापन केले जाईल.
मराठी लँग्वेज लॅब : पालिकेच्या शाळांमध्ये मराठी भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि संवर्धनासाठी 'मराठी लँग्वेज लॅब' आणि स्वतंत्र मराठी भाषा विभाग सुरू केला जाईल.
५. पर्यावरण आणि पायाभूत सुविधा
पर्यावरण संवर्धन : मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी १७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
खड्डेमुक्त रस्ते : मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले जातील आणि भविष्यात रस्ते खोदावे लागू नयेत म्हणून 'युटिलिटी कॉरिडॉर' उभारले जातील.
बेस्टचा विस्तार : २०२९ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात १० हजार बसेस असतील आणि त्या सर्व पूर्णपणे इलेक्ट्रिक (EV) असतील.
६. इतर महत्त्वाच्या घोषणा
कोल्ड स्टोरेज सुविधा : मासळी विक्रेत्यांसाठी बीएमसी मार्केटमध्ये कोल्ड स्टोरेज आणि फिश एक्सपोर्ट-इंपोर्ट सेंटरची उभारणी.
सांस्कृतिक वारसा : हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचे संग्रहालय आणि नवीन नाट्यगृहांची निर्मिती.
सुरक्षा : मुंबईला रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांपासून मुक्त करण्याची ग्वाही.
"आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आमचा ट्रॅक रेकॉर्ड जनतेसमोर आहे. पुढील पाच वर्षांत मुंबईचा कायापालट करून मुंबईकरांना शहराबाहेर जावे लागणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ." - देवेंद्र फडणवीस-मुख्यमंत्री.












Click it and Unblock the Notifications