विधानसभा निवडणुकीचा विजय हरियाणात, जल्लोष महाराष्ट्रात; भाजप म्हणते 'अब महाराष्ट्र की बारी...'
हरियाणा विधानसभेमध्ये भाजपने हॅट्ट्रीक केली. तेथे जवळपास 49 जागा जिंकल्या आहेत. भाजपने बहुमताचा 46 हा आकडा गाठला. काँग्रेसला 36 जागांवर समाधान मानावं लागलं. शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजपविरोधात वातावरण असल्याचं बोललं जात होतं. सगळ्या एक्झिट पोलमध्येही भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण सगळ्या शक्यता आणि अंदाज खोटे ठरवत हरियाणात भाजपनं घवघवीत यश मिळवलंय. या निकालानंतर महाराष्ट्रातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

नव्या मुख्यमंत्र्यांचा दसऱ्याला शपथविधी
हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशीला म्हणजेच 12 ऑक्टोबरला होऊ शकतो. आत्तापर्यंत संभाव्य मंत्रिमंडळाला अंतिम रूप दिल्यानंतर तारीख ठरवली जाईल. मात्र 12 तारखेला शपथ घेणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून समजली. गेली 10 वर्षे हरियाणात भाजपची सत्ता होती. अशा स्थितीत अँटी इन्कम्बन्सीसह अनेक बाबी समोर आल्याने भाजपचे नुकसान होताना दिसत होतं. पण भाजपने हरियाणा निवडणुकीच्या 7 महिने आधी अशी खेळी केली, ज्यामुळे काँग्रेस अडचणीत आली. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या 7 महिने आधी भाजपने अचानक तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पदावरून हटवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर नायबसिंग सैनी यांच्याकडे राज्याची कमान सोपवण्यात आली.
महाराष्ट्रात भाजपकडून जल्लोष
नायबसिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवली. एका नव्या चेहऱ्याने जनतेसमोर आणण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला. नायबसिंग सैनी यांच्यावर जनतेने विश्वास व्यक्त केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यावेळी भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. हरियाणात भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं महाराष्ट्रात भाजपचा जल्लोष सुरू झालाय. हरियाणातल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. लोकसभेतल्या फेक नरेटीव्हचं उत्तर आता थेट नरेटीव्हनं दिलंय, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. आता महाराष्ट्रातही महायुतीचा असाच विजय होईल, असा भाजपला विश्वास वाटतोय. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भाजपचा हरिणाच्या रुपानं पहिलाच मोठा विजय आहे. तसंच जम्मू-काश्मीरमध्येही भाजपची सत्ता आली नसली तरी तिथं त्याच्या जागांमध्ये मात्र वाढ झालीय.
गोंदियात फटाके फोडून आनंदोत्सव
गोंदियात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मिठाई वाटत, हरियाणाचा विजयोत्सव साजरा केला. अब महाराष्ट्र की बारी है... असे नारे देत जलोष साजरा करण्यात आला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही अतिशय मोजक्या शब्दात या विजयाचे वर्णन केले. ते म्हणाले, हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाला महत्व दिल्याचे दिसून आले. काँग्रेसने लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला मिळालेले यश नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीने मिळाले आहे. उलट जम्मू क्षेत्रात भाजपची ताकद वाढली आहे.












Click it and Unblock the Notifications