महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपची युती..? स्वतः फडणवीसांनी सांगितला प्लॅन
लोकसभेत मनसेने दिलेल्या बिनशर्त पाठींब्यातून उतराई होण्यासाठी भाजप आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना सोबत घेणार असल्याच्या हालचाली दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आज दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले. आगामी निवडणुकांची भाजपकडून कशी तयारी केली जाईल, याची हिंटही फडणवीसांनी या मुलाखतीतून दिली.

फडणवीसांनी सांगितला भाजपचा प्लॅन
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महानगरपालिका निवडणुकीचा प्लॅन सांगितला. लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत मिळलेल्या मोठ्या यशामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पुढील निवडणुकींची तयारी केली जात असल्याचे संकेत दिले. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी सोबत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनसेसोबत करणार युती
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. त्याचा फायदा आम्हाला झाला तसेच त्यांच्या पक्षालाही झाला. विधानसभेत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी पक्ष काढला आहे. त्यामुळे त्यांनाही निवडणुका लढवाव्या लागतात. त्यांनी निवडणुका लढवल्या नाही तर पक्ष कसा चालणार..? विधानसभा निवडणुकीत आम्ही तीन मोठे पक्ष होतो. त्यामुळे त्यांना देण्यासाठी आमच्याकडे जागा नव्हत्या. त्यामुळे राज ठाकरे स्वतंत्र लढले. त्यांना या निवडणुकीत चांगली मते मिळाली. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तेथे तेथे त्यांच्याशी युती करू, असे फडणवीस यांनी सांगितले.
लवकरच होतील महापालिका निवडणुका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच महापालिकेच्या निवडणुका अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण रखडले आहे. त्यासंदर्भात मी कालच वकिलांशी बोललो. या प्रकरणाची याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सर्वोच्च न्यायालयने परवानगी दिल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका होतील.












Click it and Unblock the Notifications