नागपुरात 'हिट अँड रन'चा थरार! भाजप नेत्याच्या मुलाच्या आॅडीने 3 वाहनांना उडविले, दोघे अटकेत
Nagpur Hit and Run : नागपुरात 'हिट अँड रन'चे प्रकरण समोर आले आहे. रविवारी रात्री उशिरा भरधाव वेगात आलेल्या ऑडी कारने दोन कार आणि दुचाकीला धडक दिली. अपघाताच्या वेळी ऑडी कारचा वेग खूप होता, त्यामुळे यात कार आणि दुचाकींचे मोठे नुकसान झाले. वाहनांना धडकलेली ऑडी कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याचे समोर आले आहे.
संकेत बावनकुळे कार चालवत असल्याची अफवा
ही कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे चालवत असल्याची अफवा पसरली होती. तथापि, सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत चकाटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, बावनकुळे यांचा ड्रायव्हर अर्जुन जितेंद्र हावरे (वय 24) हा ऑडी चालवत होता. हावरे सोबत त्याचा मित्र रोनित चिंतामवार (वय 27) होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास काचीपुरा चौकातून रामदासपेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. सीताबर्डी पोलिसांनी कारचालक अर्जुन हावरे आणि त्याच्या शेजारी बसलेला रोनित चिंतामवार यांच्याविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दारु पिऊन कार चालवल्याचा संशय
दारू पिऊन कार चालवत असताना हा अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ऑडी कारचा वेग जवळपास 150 किमी/ताशी होता. काचीपुरा ते सेंटर पॉइंट हॉटेल लोकमत चौकापर्यंत झालेल्या या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. आरबीआय चौकात ही कार एका दुचाकीला धडकली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी अर्जुन हावरे आणि रोहित चिंतामवार या दोघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
भाजप नेते बावनकुळे यांनी दिली प्रतिक्रिया
या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे यांनी सोमवारी सांगितले की, ऑडी कार त्यांच्या मुलाच्या नावावर आहे. पोलिसांनी या अपघाताची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी. ते म्हणाले की, "मी पोलिसांशी बोललो नाही. न्याय सर्वांना समान असला पाहिजे, मग कोणी राजकारणाशी संबंधित असो वा नसो."












Click it and Unblock the Notifications