भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत 13 रणरागिणींचा समावेश; बागडे नानांच्या जागी अनुराधा चव्हाणांना संधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच भाजपकडून आज रविवारी दि.20 रोजी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने 99 उमेदवारांचा समावेश आहे. या 99 नावांमध्ये भाजपने 13 महिलांना उमेदवारी दिली आहे. यात नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले कॉंग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या मुलीला देखील भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे.
अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया अशोक चव्हाण यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला. त्यामुळे येत्या काळात या मतदारसंघातून कॉंग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, यावर येथील विजयाचे गणित ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे फुलंब्री मतदारसंघ हा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा होता. ते राज्यपाल झाल्याने त्यांच्या जागी भाजपने अनुराधा चव्हाण यांना संधी दिली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील महिला उमेदवार
1) श्रीजया अशोक चव्हाण - भोकर
2) अनुराधाताई अतुल चव्हाण - फुलंब्री
3) सीमाताई महेश हिरे - नाशिक पश्चिम
4) सुलभा गायकवाड - कल्याण पूर्व
5) मंदा विजय म्हात्रे - बेलापूर
6) मनीषा अशोक चौधरी - दहिसर
7) गोरेगांव - विद्या ठाकूर
8) माधुरी सतीश मिसाळ - पर्वती
9) मोनिका राजीव राजले - शेगाव
10) प्रतिभा पचपुते - श्रीगोंदा
11) नमिता मुंदडा - केज
12) श्वेता महाले - चिखली
13) मेघना बोर्डीकर - जिंतूर
अशोक चव्हाणांच्या मुलीला संधी
श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. यावर अशोक चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला आहे. जनमानसाची साथही तिला या निवडणुकीसाठी मिळेल. याआधीही ती या मतदारसंघात चांगलं काम करत होती आणि आता उमेदवार या नात्याने तिला काम करायला अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बागडे नानांच्या जागी चव्हाण यांना संधी?
फुलंब्री विधानसभा मतदारंसघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांची नुकतीच राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर आता अनुराधा चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे फुलंब्री मतदारसंघात भाजपमध्ये बंड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.












Click it and Unblock the Notifications