अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, भाजप आमदारासमोरच पदाधिकारी संतापले
पुणे: महायुतीतील घटक पक्षांकडून एकापाठोपाठ एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप करण्याची मालिका अद्यापही सुरूच आहे. अजित पवारांना सोबत घेत्यामुळं लोकसभा निवडणुकीत नुकसान झाल्याचा आरोप संघाच्या मुखपत्रातून करण्यात आला होता. तेव्हापासूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल महायुतीतील अनेक नेत्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात तर शिवसेनेचे ज्येष्ठे नेते रामदास कदम यांनी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या समोरच अजित पवारांना सोबत घेण्याच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केली होती. अजित पवारांना सोबत घेण्याची घाई केली अशा शब्दांत रामदास कदम यांनी आपली खदखद व्यक्त केली होती.

यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही वारंवार मित्रपक्षांना खडेबोल सुनावले आहे. हे सगळं सुरू असतानाच आता पुण्यातून सुद्धा अजित पवारांच्या महायुतीतील समावेशावरून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुण्यात नेमकं काय घडलं?
भारतीय जनता पक्षाकडून पुण्यात शिरुर लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासह पुणे जिल्ह्यातील नेते तसेच पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकी दरम्यान भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे उपजिल्हाअध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची भूमिका मांडली.
सुदर्शन चौधरी स्पष्टचं बोलले
अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. यामुळे महायुतीमध्ये आम्हाला अजित पवार नको आणि अजित पवार असतील तर विधानसभेला सत्ताही नको अशा परखड शब्दांत सुदर्शन चौधरी यांनी आमदार राहुल कुल यांच्यासमोरच आपला संताप व्यक्त केला.
उपस्थितांना उद्देशून सुदर्शन चौधरी पुढे म्हणाले, कार्यकर्ते काय सांगतत याचा खरच विचार करणार असाल तर अजित पवारांना महायुतीमधून बाहेर काढा. त्यांनी यापूर्वीही सुभाषबापू, योगेश अण्णा, राहुल दादांवर अन्याय केला आहे.
हे तिघेही आज मंत्री झाले असते. तर अनेकांना महामंडळ मिळाले असते. आम्ही ज्यांना १० वर्ष विरोध केला, आता तीच राष्ट्रवादी तुम्ही आमच्या बोकांडी बसवली अशी खदखद चौधरी यांनी मांडली.
अजित पवार गट काय उत्तर देणार?
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. महायुतीतील घटक पक्षांकडून अजित पवारांना एकटे पाडण्याचा प्रयत्न ज्यांना केला जात असल्याच्या चर्चेने या निमित्ताने जोर धरला आहे. यावर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया दिल्या जाते हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications