'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात मोठी अपडेट!...तोपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही, काय ठरलंय
Majhi Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 'योजनेअंतर्गत पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता केव्हा वितरित केला जाईल, याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या 2 कोटी 59 लाख महिला लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा 3 हजार 885 कोटी रुपये लागतात. अशातच नवीन अपडेट समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासोबतच संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना व स्वत:हून लाभ नाकारणाऱ्या लाभार्थीं महिलांची संख्या 5 लाख 40 हजारांपर्यंत झाली आहे. सध्या ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चारचाकी आहेत, त्याची पडताळणी सुरु आहे. त्यामुळे पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही, अशी वस्तुस्थिती समोर आली आहे.

तक्रारी आल्यानंतर सुरू झाली चौकशी?
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अवघ्या अडीच महिन्यांत अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. तालुका व जिल्हास्तरीय समित्यांकडून त्या अर्जांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही. पण निवडणुकीच्या निकालानंतर योजनेसंदर्भात काही तक्रारी आल्या. त्यानुसार आता योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार योजनेत अपात्र लाडक्या बहिणी नेमक्या किती, याचा शोध घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात आता महिला लाभार्थींच्या नावावरील चारचाकी वाहनांची पडताळणी सुरु आहे.
अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पडताळणी..!
त्यासाठी राज्य स्तरावरुन आलेल्या याद्या अंगणवाडी सेविकांना दिल्या असून त्यांच्याकडून घरोघरी पडताळणी सुरु झाली आहे. पडताळणी नंतर त्यासंदर्भातील अहवाल आठ दिवसांत शासनाला सादर केली जाणार आहे. त्यानुसार अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीं संदर्भातील निर्णय राज्यस्तरावरुनच होणार आहे. त्यानंतर पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभ वितरित केला जाईल, अशी सद्य:स्थिती आहे. त्यासाठी मार्च महिना उजाडेल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या पडताळणीमुळे सध्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबल्याची स्थिती आहे.
पडताळणीचा अहवाल सरकारला पाठविला जाणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चारचाकी वाहने आहेत, त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरु आहे. त्यासाठी आणखी आठ-दहा दिवस लागतील. त्यानंतर त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाईल आणि शासन स्तरावरून त्यासंदर्भातील निर्णय होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील महिन्यात फेब्रुवारीचा हप्ता मिळेल असे दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications